Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Posts Tagged ‘क्रॅनबेरी’

स्वयंपाकघरात अनेकदा वेगवेगळे प्रयोग करावे लागतात; कधी एवढ्यासाठी की हवा असलेला एखादा भारतीय जिन्नस मिळाला नाही म्हणून तर कधी एवढ्यासाठी की एखादा नवीन स्थानिक जिन्नस चांगला मिळाला म्हणून. विशेषतः उन्हाळ्यात इथे अनेक प्रकारच्या बेरीज थोड्या दिवसांसाठी अगदी भरपूर मिळतात आणि त्यांचं नक्की काय करायचं असा प्रश्न पडतो. जॅम किंवा इतर गोड पदार्थ खूप बनविले जातात पण गोड तरी किती खाणार म्हणून मग ही फळे वापरून लोणची किंवा चटण्या बनविल्या जातात. पण चांगलं लोणचं बनवायचं तर फळ जरा आंबट किंवा करकरीत असावं लागतं; म्हणून यावर्षी मी महाराष्ट्रीयन कैरी लोणचे मसाला वापरून गूसबेरी आणि क्रॅनबेरी या दोन वेगळया फळांची लोणची बनवली आणि दोन्ही उत्तम झाली.

गूसबेरीला अनेकदा आवळा म्हणून संबोधलं जातं आणि ही थोडीशी आंबट बेरी दिसतेही बरीच आवळ्यासारखी पण हा भारतीय आवळा नव्हे. हे फळ कच्चे असताना अगदी आंबटकच्च असते पण थोडे पिकले कि त्याची गोडी वाढते. Gooseberryसुंदर पोपटी रंगाच्या गूसबेरीत भरपूर पेक्टीन असल्याने हिचा जॅम बनवायला खूप उपयोग होतो. मी यावर्षी उन्हाळ्याच्या सुरवातीला आणलेली गूसबेरी खूपच आंबट होती म्हणून मी ती आवळ्यासारखी मीठ लावून तोंडात टाकली तर मला जाणवले की ह्याचं लोणचं छान होईल. मग मी खालील कृती वापरून लोणचे मसाला बनविला आणि शेंडा-बुडखा काढून अर्धी चिरलेली गूसबेरी त्यात मिसळली आणि एक निर्जंतुक केलेल्या बरणीत भरली. जास्त आंबटपणासाठी ३-४ चमचे लिंबाचा रस त्यात ओतला, वरून थोडी गार केलेली फोडणी घातली आणि बाटली गच्च झाकून ठेऊन दिली. हे लोणचे फारच पट्कन मुरले. साधारणतः २ आठवड्यात खायला तयार झाले. इतके मस्त झाले की मी जून महिन्यात बनविलेले अर्धा किलोचे लोणचे सप्टेंबरपर्यंत संपलेही!

गेल्या काही दिवसांत बाजारात ख्रिसमसमुळे क्रॅनबेरीज दिसायला लागल्या आहेत म्हणून मग मी हीच कृती वापरून क्रॅनबेरीचेही लोणचे बनविले. त्यासाठी आधी क्रॅनबेरीज थोड्या धुवून स्वच्छ फडक्याने पुसून घेतल्या. नंतर वेळ वाचविण्यासाठी एकेक चिरण्याऐवजी फूडप्रोसेसरमध्ये क्रॅनबेरीज किंचित् फिरवून घेतल्या पण फार बारीक केल्या नाहीत. नंतर एका भांड्यात क्रॅनबेरीज आणि लोणचे मसाला एकत्र केला आणि निर्जंतुक केलेल्या बाटलीत भरून वरून गार केलेली फोडणी घातली. हे लोणचे तर अगदी बनविल्याबरोबर लगेच खाता आले पण थोडे मुरल्यानंतर तर ते अजुनच मस्तं लागतेय.cranberry lonche

महाराष्ट्रीयन कैरी लोणचे मसाला

मोहरीची डाळ २ मोठे चमचे

मोहरी पूड २ मोठे चमचे

मेथ्या २ छोटे चमचे

हिंग १ चमचा

हळद १ छोटा चमचा

तेल एक वाटी

तिखट २ मोठे चमचे

मीठ ४ ते ६ मोठे चमचे

मीठ आणि तिखटाचं नेमकं प्रमाण हे शेवटी प्रत्येकाला आपापल्या चवीप्रमाणे ठरवावे लागेल कारण तिखटाची तीव्रता वेगवेगळ्या जातींच्या मिरच्यांप्रमाणे वेगवेगळी असते आणि प्रत्येकाची तिखट खाण्याची क्षमताही वेगवेगळी असते. मीठ कमी घालावे तर लोणचे लवकर खराब होण्याची भीती आणि जास्त वापरावे तर लोणचे खारट होण्याची काळजी! शिवाय काही जण प्रकृतीसाठीदेखील मीठ कमी खातात. मी सहा मोठे चमचे मीठ वापरले पण लोणचे किंचित खारट वाटले त्यामुळे पुढच्या वेळेस थोडे कमी मीठ वापरून पाहीन.

प्रथम मेथ्या थोड्या तेलात तळून मग त्याची पूड बनवावी. हिंग, हळद आणि तेल सोडून इतर सगळे जिन्नस एकत्र करून घ्यावेत. कढईत मोहरी आणि हिंग घालून तेलाची फोडणी करून घ्यावी आणि किंचित कोमट झाल्यावर त्यात हळद मिसळून मग गार होऊ द्यावी. गार झाल्यावर वर ओतण्यासाठी पाव वाटी फोडणी बाजूला काढून उरलेली पाऊण वाटी मसाल्यात मिसळावी. हा लोणचे मसाला साधरणतः अर्धा किलो फळांसाठी पुरेसा होईल.

बाटल्या निर्जंतुक करण्यासाठी मी त्या आधी स्वच्छ धुवून घेते आणि ओल्या असतानाच त्या १४० डेग्रीला गरम केलेल्या ओव्हनमध्ये जाळीवर उपड्या करून ठेवते. अर्ध्या तासानंतर ओव्हन बंद करून बाटल्या त्यातच गार होऊ देते. जॅम किंवा इतर गरम पदार्थ भरायचे असतील तर मात्र बाटल्या गरम असतानाच त्यात गरम जॅम भरावा लागतो नाहीतर बाटली तडकते. या पद्धतीने बाटल्या निर्जंतूक करायच्या असतील तर त्या गरम करण्यासाठी योग्य आहेत का याची आधी खात्री करून घ्या.

Read Full Post »