Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘Uncategorized’ Category

अखेर काल संध्याकाळी टीव्हीवर ‘ऑन डिमांड’ चाळत असताना ‘ज्युली अँड ज्युलीया’ हा सिनेमा त्या यादीत दिसला. खाण्यावरती प्रेम असणारया प्रत्येकाने जणू हा सिनेमा पहायलाच हवा अशी काही हवा तो प्रदर्शित झाल्यापासून तयार झाली होती आणि सहाजिकच माझी उत्सुकता चाळवली गेली होती. चित्रपट पहायचा मुहूर्त मात्र अनेक दिवस लागत नव्हता पण काल मनापासून बनविलेल्या रोगन जोशचे ओकनागन व्हॅलीच्या सुरेख पोर्टबरोबर स्वादिष्ट जेवण झाल्यावर मस्त मूड लागला होता. शिवाय भरल्या पोटी पाहिल्याने, असला खाण्यावरचा सिनेमा पाहून फार चिडचिड होण्याची शक्यता नव्हती. नवऱ्याने सिनेमाच्या निवडीवर थोडा मंद विरोध करून पाहिला पण नुकत्याच हादडलेल्या माझ्या रोगन जोशची पुण्याई तो सुदैवाने विसरला नव्हता आणि बेत कायम राहिला. (सिनेमा सुरू झाल्यावर नियमाप्रमाणे विसाव्या मिनिटाला माझ्या खांद्यावर डोके ठेऊन स्वारीचे डोळेही लागले आणि नियमाप्रमाणे वैतागून मी त्याला कोपराने ढोचून उठवलेही.)

प्रख्यात अमेरिकन पाककलानिपुण लेखिका ज्युलिया चाईल्ड आणि तिच्यानंतर साठ वर्षांनी जन्मलेल्या ज्युली पॉवेल या ब्लॉगलेखिकेच्या समांतर आयुष्यावर भाष्य करणारा हा सिनेमा माझ्यासारख्या लोकांसाठीच बनवला गेला असावा. सिनेमा पाहताना मी त्यात पुरती गुंतून गेले हे खरंच पण हे त्या सिनेमाच्या दर्जाबद्दलचं भाष्य नव्हे; गुंतून गेले ते बऱ्याच स्वयंकेंद्री भूमिकेने. आयुष्याच्या मध्यावर, पाककलेवरच्या प्रेमाने आणि फ्रान्समधल्या वास्तव्याने भारून जाऊन त्या क्षेत्रात स्वत:ला झोकून देणारी ज्युलिया, अमेरिकन म्हणून आणि स्त्री म्हणून थोडीफार अवहेलना झालेली ज्युलिया, फ्रान्सच्या आणि पॅरिसच्या प्रेमात पडलेली आणि तरीही नाईलाजाने नवऱ्याबरोबर मायदेशी परतलेली ज्युलिया, स्वत:च्या अपयशांवर आणि निराशेवर फुंकर घालायला स्वयंपाकघरात घुसलेली ज्युली, पुस्तकाच्या रूपाने आपल्या आधीच्या पिढीच्या सुगरणीकडून शिकताना मनातल्या मनात तिच्याशी संवाद साधणारी ज्युली….या सगळ्यांशी मी माझी साम्यस्थळे शोधत असताना सिनेमा पुढे सरकत राहिला.

सिनेमा संपल्यावरही डोक्यातली चक्रे चालूच राहिली, अजूनही चालूच आहेत. मी एवढी झपाटल्यासारखी खाण्याबद्दलच का बोलते, का वाचते, स्वयंपाकघरात स्वत:ला का डांबून घेते, सुटीच्या दिवशी आराम करण्याऐवजी भाजीबाजाराला जाऊन मग नंतर मोठया स्वयंपाकाचा घाट का घालते, निराश झाले की बाजारात जाऊन स्वयंपाकघरासाठी एक नवीन उपकरण का विकत आणते, फसलेला पदार्थ मला जमेपर्यंत घरादाराला ऊत का आणते या सगळ्याचा आता जरा विचार करायला झाला आहे.

माझं खाण्यावर प्रेम आहे, स्वयंपाक करणे हा माझा छंद आहे, माझ्या पदार्थाला कोणी अभिप्राय दिला की मला मनापासून आनंद होतो वगैरेच्या पुढे जाऊन या क्षेत्रातली नवनवीन कौशल्ये मला शिकाविशी वाटतात, नवनवीन कसोट्यांवर स्वतःला आजमावून पहाणे मला आवडते आणि माझ्या छंदाला एकेदिवशी माझा व्यवसाय बनवायचे दिवास्वप्न गेली काही वर्षे मी रोज पहाते इथपर्यंत येऊन मी थबकते. या पुढचा मार्ग ज्युली आणि ज्युलीयासारखाच अपेक्षितच हवा का? यशाच्या व्याख्या समाजानेच दिलेल्याच असाव्यात का? पुरेसे व्यावसायिक यश न मिळाल्याने किंवा प्रसिद्धी न मिळाल्याने आपल्या छंदावरचे प्रेम कमी होते का असे काही प्रश्न मला अंतर्मुख करतात आणि या प्रश्नांपाशीच मला ज्युली आणि ज्युलीयातले अंतर सापडते. ज्युलीयाने ज्युलीला दूरच का ठेवले याचे उत्तरही सापडते. अनेक वर्षे अनेक प्रकाशकांनी नाकारल्यानंतरही आपल्या पुस्तकावर काम करत रहाणारी ज्युलीया, पुन्हा-पुन्हा सुरवात करायला न घाबरणारी ज्युलिया, खाण्यावर मनापासून प्रेम असणारी ज्युलिया मला मनोमन आवडते. त्याच्या तुलनेत, यशस्वी व्हायचे म्हणून दुसरी ज्युलिया व्हायचा प्रयत्न करणारी ज्युली, ज्युलीयासारखी मोत्याची माळ पोरकटपणे मिरवणारी ज्युली, थोड्याश्या अपयशाने कोलमडून पडणारी आणि त्यापायी स्वयंपाकावरचे प्रेम उडणारी ज्युली सरळसरळ उथळ दिसायला लागते.

खरंतर पॅरिसमध्ये राहून महाग कुकरी स्कूलमध्ये शिकणे परवडू शिकणारी उच्चवर्गीय, सुखवस्तू ज्युलिया सुरवातीला मला किती दूर भासली होती; तिच्याबद्दल किंचित असूयाही वाटली होती. त्यापेक्षा दिवसभर न आवडणारी नोकरी करून घरी येऊन, आपल्या छोट्या आणि साध्या स्वयंपाकघरात आनंद शोधणाऱ्या ज्यूलीबद्दल मला जास्त जवळीक आणि सहानुभूती वाटली होती. एमी एड्म्सनेही तिच्या गोडगोड व्यक्तिमत्वाने ज्युलीला खरी नायिका बनवायचा प्रयत्नही केला होता पण तीदेखील ज्युलीच्या उथळपणाला, यशस्वी व्हायच्या तिच्या स्पर्धात्मक इच्छेला लपवू शकली नाही. आयुष्य म्हणजे एक स्पर्धा आहे आणि त्यात यशस्वी व्हायचे असेल तर येनकेन प्रकारेण प्रसिद्धी मिळविणे आणि त्याचा वापर करून पुस्तके विकणे हेच तिचे ध्येय असावे आणि त्यातुलनेत तिची तिच्या छंदावरची श्रद्धा पोकळ असावी अशी शंका आल्यावाचून रहात नाही.

इथे मी थबकते,  स्वतःलाच काही प्रश्न विचारते, माझी प्रामाणिकता पडताळून पहाते आणि मनोमन जाणते की खरंच माझे उद्देश प्रामाणिक आहेत, माझे अनुभव, माझे छंद इतरांबरोबर वाटण्यामागे केवळ संवाद साधण्यापलीकडे माझे इतर काही हेतू नाहीत. शिकताना, चुकताना, बनविताना, सादर करताना आणि त्याबद्दल बोलताना, लिहिताना मला मिळणारा निखळ आनंद, फक्त हा आनंदच माझा उद्देश आहे.  दिवास्वप्ने मी देखिल पहाते पण ती स्वप्ने अपूर्ण राहिली तरी त्यामुळे माझे त्यांच्यावरचे प्रेम थोडेच कमी होईल अन ती पहाण्याचा आनंद आणि ती खरी होतीलही या शक्यतेने मिळणारा हुरूप कमी थोडाच होईल!

हे सगळे साक्षात्कार हा सिनेमा पहाताना झाले, सिनेमा पाहिल्यावर ज्युलिया चाईल्डचे पुस्तक आणून पदार्थ करून पहाण्याची सुरसुरी आली, माझ्याही नकळत किती सारे फ्रेंच पदार्थ मी वेळोवेळी बनविते हे लक्षात आले आणि सिनेमा पहाताना घातलेला माझा वेळ सत्कारणी लागला. आज सकाळी एग्ज बेनी साठी हॉलंडेज सॉस बनवायची कसरत करत असताना ज्युलीयाची आठवण आली आणि मी पुन्हा दिवास्वप्न पहायला लागले…माझ्या गोष्टीची सुरवात अशी होईल का….

“त्यादिवशी सगळ्या शंका, विवंचना विसरून ती स्वयंपाकघरात घुसली, शांतपणे सुरयांना व्यवस्थित धार लावली आणि निर्धाराने कामाला लागली…”

EggBenny

Advertisements

Read Full Post »

गेल्या काही दिवसांपासून आमच्या घरावर फ्रेडीचं राज्य आहे. दिवसरात्र सारेजण या राजाच्या पुढेमागे करत असतात. फ्रेडीला गाजर द्या, फ्रेडीला गवत द्या, फ्रेडीला बाहेर घेऊन जा, फ्रेडीचं घर साफ करा, फ्रेडीशी खेळा, फ्रेडी कंटाळला असेल, फ्रेडीला बरं नसेल…फ्रेडी हे आणि फ्रेडी ते. खरं तर हा आमचा दोन आठवड्याचा पाहुणा पण आता तो पुरता घरचा बनून गेला आहे. आमचा एक मित्र ख्रिसमससाठी कुटुंबासहित पोलंडला गेला आणि जाताना थोडे दिवसांसाठी त्याच्या सशाला आमच्याकडे सोडून गेला. पांढराशुभ्र रंग, काळे कान आणि डोळ्यांवर आणि गालावर दोन काळे ठिपके असलेला फ्रेडी म्हणजे अगदी मदनाचा पुतळा आणि  स्वच्छतेचा भोक्ता आहे. दिवसांतून चार वेळा स्वत:ला चाटून-चाटून साफ करतो आणि आपले सगळे विधी आपल्या पिंजऱ्यातच उरकतो. शिवाय हा गडी इतर सशांसारखा बिलकुल भिडस्त नाही, जवळ येऊ देतो, त्याच्या मऊशार मखमलीवर हात फिरवू देतो, आणि रंगात आला की मस्त पकडापकडीचा खेळ खेळतो. एरवी सुट्ट्यांमध्ये अगदी कंटाळून जाणारी माझी पोर यावेळेस मात्र फ्रेडीच्या मागेमागे धावत सुट्या अगदी मनापासून उपभोगतेयं. हे चालतं-फिरतं, जिवंत खेळणं कोणालाही वेडं करेल मग लहान मुलांची काय बात!

याच फ्रेडीमुळे मला अजून एक अनपेक्षित प्रेरणा मिळाली. माझी आई विणकामात अगदी निष्णात आहे आणि ‘धागेदोरे’ या ब्लॉगवर ‘रॅव्लरी’ या विणकामाबद्दलच्या स्थळाविषयी वाचल्यापासून मला तिला काही नमुने दाखवायचे होते. म्हणून मी सहज चाळत असताना तिथे हा एग कोझी ससा माझ्या आणि माझ्या मुलीच्या दृष्टीस पडला. तो पहिल्यापासून ही बया माझ्यामागे लागली की आजीला विणायला सांगू आणि तिचा उत्साह पाहून मला वाटले की आपणच हा प्रयत्न करून पाहू. खरंतर मला विणकामाचा बिलकुल छंद नाही; लहानपणापासून आईकडे शिकायला बऱ्याच जणी येत असत आणि आई त्यांना उत्साहाने शिकवत असे पण माझ्यात ही आवड निर्माण करण्यात मात्र आईला काही यश आले नाही. दोन-दोन तास डोकं खाली घालून विणल्यावर समजणार की वीस ओळींपूर्वी चूक झाली होती, मग काढा सगळं उसवून! शिवाय आई समोरच असल्याने तिच्या असंख्य सूचना सुरू…धागे फार ओढू नकोस, सैलसरच ठेव, हे नीट नाही झालं, ते असं कर… या सगळ्या प्रकारात लोक छंद म्हणून का विणायला घेतात ते मला कधीच कळले नाही. पण तरी ख्रिसमसची भेट म्हणून पिल्लाला स्वत: विणलेला ससा देण्याचा मोह मला टाळता आला नाही. ज्युलीच्या Little Cotton Rabbits या ब्लॉगवरून नमुना विकत घेतल्यावर तिने अगदी व्यवस्थित लिहिलेला आणि पद्धतशीर माहिती असलेला नमुना पाठविला पण तरी अनेक वर्षं काहीच विणलेलं नसल्याने अनेक शंका आल्या. सुदैवाने http://www.knittinghelp.com/ या उत्तम स्थळावर विणकामासंबंधी अनेक चित्रफिती आहेत ज्याचा मला अतिशय उपयोग झाला. ही भेट मुलीच्या डोळ्याआड पूर्ण करायची असल्याने रात्री ती झोपल्यानंतरच लोकरीला हात लावता यायचा. चुकत-शिकत शेवटी हा ससा तयार झाला आणि तो बनवताना माझ्याही नकळत मला खूप मजा आली. तो दिसतोयही बरा आणि ही भेट मिळाल्यानंतरचा पिल्लाचा फुललेला चेहेरा ही माझ्यासाठीच भेट होती. पण ही पोरटी मला म्हणते कशी “इतका सुंदर ससा आजीने विणून पोस्टाने पाठविला का”? त्याचं नाव काय ठेवायचं हा प्रश्न काही कोणाला पडलाच नाही; खरा फ्रेडी त्याच्या घरी गेला की त्याची आठवण म्हणून हा लोकरी फ्रेडी आमच्यापाशी नेहमी राहील.

पण खरा फ्रेडी परत गेल्यावर आमचं घर मात्र सुनंसुनं होणार. मग आमच्या केबल्स कोण कुरतडणार, खिडकीत ठेवलेलं माझं हर्ब गार्डन कोण खाणार आणि आपल्या मखमली स्पर्शाने आमच्या पायापायात कोण घुटमळणार?

Read Full Post »

कधी काही पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ बनवायचा असला आणि त्याबद्दल मला कोणतीही शंका आली की माझी पावले सहजच पुस्तकाच्या कपाटाकडे वळतात आणि मी ‘रुचिरा’ उचलते. गेली बारा-तेरा वर्षं वापरून-वापरून माझ्या पुस्तकाची पाने अगदी निखळायला लागली आहेत, त्यावर हळदीचे, तेलाचे आणि तिखटाचे डाग पडले आहेत पण तरी हे पुस्तक चाळताना अजूनही मला नेहेमी नवीन काहीतरी सापडतं. कमलाबाई ओगलेंनी एक खाद्यपदार्थांचं पुस्तक नव्हे तर जणू माझ्या पिढीजात खाद्यसंस्कृतीचा सारांशच माझ्या हातात ठेवला आहें असं वाटतं. आईकडून मुलीला आणि तिच्याकडून तिच्या  मुलीला जसं सहजपणे द्यावं तसं हे देणं आमच्या हातात पडलं आहे. पुस्तकात पाककृती आहेत पण त्यात क्लिष्टता नाही, उपयोगी सूचना आहेत पण वाचणाऱ्याच्या क्षमतेबद्दल थोडा विश्वास आणि थोड्या अपेक्षाही आहेत, पर्यायी जिन्नस आणि इतर माहितीही आहें. पुस्तकाचा आवाका एवढा मोठा आहें कि त्यात रोजच्या स्वयंपाकापासून ते १०० माणसांसाठी पंचपक्वान्नाच्या खास पंगतीपर्यंत सारं काही आहें. आजकालच्या जमान्यात एखाद्या लेखकाने त्यातल्या वेगवेगळ्या प्रकारांचे १० खंड काढून, ते अनेक फोटोवगैरे घालून चकमकीत बनवून अव्वाच्या सव्वा किंमतींना विकले असते पण कमलाबाईंनी केवळ ९० रुपयांत मिळणारया या एकाच साध्या पुस्तकात, हातचे काही न राखता आपल्या आयुष्यभराच्या अनुभवांची आणि ज्ञानाची तिजोरी आपल्यापुढे रिकामी केली आहें.  

माझी आई अतिशय सुगरण आहें आणि तिची आईही सुगरण होती पण मला आठवतेय तेंव्हापासून कधी काही अडलं तर आईनेही ‘रुचिरा’चाच आधार घेतला आहें. माझ्या आता लक्षात येतंय की आईकडून मुलं जे शिकतात ते बरेचदा पाहून आणि नकळत कानावर पडलेल्या गोष्टी ऐकून, पण मला हे शिकव असं म्हणून, समोर बसून काही लिहून घ्यावं असं फारसं कोणी करत नाही. त्यामुळे अनेकदा आईकडून शिकायचं राहून जातं आणि मग ‘रुचिरा’ मदतीला येते.

मला माझा स्वयंपाकघरातला पहिला अनुभव आठवतोय. आई काही कामानिमित्त बाहेरगावी गेली होती पण आज्जी घरी होती. आई घरी नाही म्हणून मी स्वयंपाक करायचा ठरवला आणि आज्जी सारख्या सूचना करते म्हणून दरवाजाही बंद करून घेतला. मी तेंव्हा फक्त १०-१२ वर्षांची होते आणि त्यापूर्वी मी चहा सोडून काही बनविले नव्हते पण तरी मी साखरभात बनवायचे ठरविले ते रुचिराच्या जोरावर. मला आठवतयं की सगळ्यांनी तो भात कौतुक करून करून (प्रोत्साहन देण्यासाठी असेल) खाल्ला होता आणि मला प्रचंड आत्मविश्वास मिळाला. आजही, इतकी वर्षं  स्वयंपाक करत असूनही, पुरणपोळी किंवा उकडीचे मोदक करताना काही विसरत तर नाही ना हे पडताळण्यासाठी रुचीरावर नजर टाकली जातेच.

पण मला या पुस्तकात सर्वात जास्त काय भावतं तर त्यातलं कमलाबाईंचं मनोगत. दरवेळी ते वाचताना त्यांच्या प्रत्येक शब्दामागचा प्रामाणिकपणा, साधीसोपी शैली आणि विनम्रता मला भारावून टाकते आणि का कोण जाणे पण माझे डोळे कृतज्ञतेने भरून येतात. त्यांनी हे पुस्तक आपल्या सासूबाईंना अर्पण केलयं ज्यांच्याकडून त्या स्वयंपाक करायला शिकल्या पण हे पुस्तक लिहून माझ्यासारख्या अगणित मुलींना शिकवणाऱ्या कमळाबाईंचे हे ऋण आम्ही कसे फेडावे? प्रकाशकाने कमलाबाईंचा उल्लेख ‘सव्वा लाख सुनांची आवडती सासू’ असा केला आहें पण मला वाटते की ‘अगणित मुलींची सुगरण आई’ हे नाव जास्त सयुक्तिक आहें.

Read Full Post »