Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘बेकिंग’ Category

पुन्हा स्थलांतर. नवा खंड, नवे हवामान, नवे लोक, नव्या पद्धती आणि नव्या खाद्यसंस्कृती. जुन्यातून पाय निघत नाहीय आणि नव्यात अजून पूर्ण सामावून जाता येत नाही अशी काहीशी दोलनामय, अस्वस्थ मनोवस्था. खरंतर वयाच्या वेगळ्या वळणावर हे सारे मोठे बदल किती रोमांचक वाटायचे, उत्साहाने स्वीकारले जायचे! नवीन वातावरणात सामावून जायची, जे हातून सुटले त्याबद्दल हुरहूरण्याऐवजी जे हाती लागले त्याच्या नवलाईने हरखून जायची मानसिकता वयानुसार बदलत असावी बहुतेक! पण आता या वळणावर, या स्थलांतरात, हातातले काहीच सुटू नये असे वाटतेय (जे अशक्यच आहे), म्हणूनच ही थोडीशी उदासीनता.

पाणी जड आहे, दूध-दह्याला फारशी चव नाही, ओळखीचे जिन्नस दुकानाच्या फडताळांवर सापडत नाहीत, बाहेर खायला गेले तर भल्यामोठ्या आकारमानाचे अतिसुमार किंवा अतिबेचव पदार्थ, घरी स्वयंपाक करायला लागणारी सगळी उपकरणे अजून जहाजाने आली नाहीत, एक ना अनेक तक्रारी. खरंतर सर्वात तापदायक होतो तो म्हणजे स्वत:चा हा तक्रारखोरपणा पण ‘नाराजी लपवायची आणि हसतमुखाने नवीन आव्हाने झेलायची’ वगैरेसाठी जो जन्मजात समजूतदारपणा लागतो तो आमच्याकडे अंमळ कमीच! म्हणून मग, ‘आपल्याकडे’ ‘हे’ जास्त चांगलं मिळायचं आणि इथल्या ‘ह्या’ला चवच नाही वगैरे निष्कर्ष काढत चिडचिड करायची. गंमत अशी की इतक्या स्थलांतरांनंतर ‘आपल्याकडे’ या शब्दाची व्याख्या दर मिनिटाला बदलते याची जाणीवही दर मिनिटाला होत असते.

मग एके दिवशी सुपरमार्केटमध्ये भाजीच्या रांगेत ‘टोमॅटिलो’ दिसतात. इतके दिवस केवळ पुस्तकात आणि जालावरच्या चित्रात पाहिलेले हे टपोरे, आंबटसर फळ हातात येते आणि अंगात उत्साह संचारतो, करून पहायच्या असलेल्या कितीतरी कृती आठवतात, नाराजी कुठल्याकुठे पळून जाते आणि ‘नवीन ठिकाणी नवीन जिन्नस, नवी खाद्यसंस्कृती’ ही साधीसोपी गोष्ट हळूहळू पचनी पडते. थोड्याच दिवसांत फार्मर्स मार्केटचाही शोध लागतो आणि तिथे गेल्यावर तर मग स्थानिक भाजीपाला, फळफळावळ यांची विविधता पाहून तर डोळ्यांत अक्षरशः पाणी येतं. ही अतिशयोक्ती नव्हे, पण सुपीक जमिनीतून आलेली रसरशीत समृद्धी पहाणे आणि त्याचा उपभोग घेण्याची ऐपत असण्याइतके भाग्यवान आपण आहोत ही भावना मला भावविवश करायला पुरेशी आहे. मग विक्रेत्यांशी थोड्या गप्पा, भरलेल्या पिशव्या आणि पोटात थोडे चविष्ट पदार्थ गेल्यावर मी माणसात येते आणि झपाटल्यासारखी  स्वयंपाकघरात घुसते. दरम्यानच्या काळात जहाजाने सामानही येतं आणि घर, घर वाटायला लागतं. आपल्याला आनंदी रहायला इतक्या गोष्टी लागतात याची किंचित अपराधी टोचणीही लागते पण आवडत्या कपातून चहा पिताना ती विसरूनही जाते.

अनेक नवीन पदार्थ बनवून पाहिले पण इथे आल्याआल्या विमानतळावरच ज्या मेपल क्रीम कुकीज मला बेहद्द आवडल्या होत्या त्या बनवायला जी मजा आली ती वेगळीच! मेपल सिरपच्या गोडीत जो खमंगपणा आणि स्वाद आहे त्याचा दुहेरी उपयोग या बिस्किटांत केला जातो. कुकीज बनविताना त्यात ब्राऊन साखरेच्या जोडीने वापरलेले मेपल सिरप आणि आतल्या क्रीमच्या सारणात वापरलेले मेपल सिरप या दोन्हीमुळे जिभेवर रेंगाळत रहाणारी चव म्हणजे या नवीन देशाने मला दिलेली ‘प्रतिकात्मक’ गोड भेटच आहे.

साहित्य (कुकीजसाठी):

२२५ ग्रॅम लोणी

२०० ग्रॅम ब्राऊन साखर

१२५ मिली मेपल सिरप

२ चमचे मेपल एक्स्ट्रॅक्ट

१ अंडे

अर्धे जायफळ किसून

३२५ ग्रॅम मैदा

२ चमचे बेकिंग पावडर

पाव चमचा मीठ

साहित्य (मेपल क्रीमसाठी):

४ मोठे चमचे लोणी

१ कप (१२५ ग्रॅम) आयसिंग/दळलेली साखर

२ मोठे चमचे मेपल सिरप

प्रथम लोणी फ्रीजमध्ये असल्यास बाहेर काढून मऊ होईपर्यंत ठेवावे.

मैदा, मीठ, बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यावे आणि त्यात किसलेले जायफळ मिसळावे.

लोणी आणि साखर एकत्र करून हलके होईपर्यंत फेटावे.

त्यात मेपल सिरप घालून पुन्हा फेटावे.

मैद्याचे मिश्रण त्यात मिसळावे व तयार झालेल्या पिठाचे दोन गोळे करून फ्रीजमध्ये दोन तास ठेवावेत.

ओव्हन १८० डीग्रीजला तापवून घ्यावा.

मिश्रण लाटण्याने लाटून हव्या त्या आकारात कापावे, मेपल पानाचा आकार मिळाला तर उत्तमच.

कुकीज ओव्हनमध्ये ८-१० मिनिटे किंवा किंचीत सोनेरी होईपर्यंत भाजून काढाव्यात.

बाहेर काढल्यावर कुकीज थोड्यावेळ (३-४ मिनिटे) बेकिंग ट्रेवरच गार होऊ द्याव्यात आणि नंतर कूलिंग रॅकवर काढून गार होऊ द्याव्यात.

क्रीमच्या मिश्रणासाठी लोणी फेटून घ्यावे व त्यात मेपल सिरप आणि आयसिंग साखर घालून मिश्रण एकत्र येईपर्यंत फेटावे.

गार झालेल्या कुकीजवर थोडे क्रीमचे मिश्रण लावून त्यावर दुसरी कुकी ठेवावी व हलकेच दाबावे.

क्रीमचे मिश्रण न घालतादेखिल या कुकीज पुरेश्या गोड, खुसखुशीत आणि चविष्ट लागतात.

कृतीसाठी या  आणि या  दोन्ही ब्लॉगवरील माहिती वाचली आणि त्या आधारे किंचित फरक करून प्रमाण वापरले.

Advertisements

Read Full Post »

ज्यात लोणी नाही, मैदा नाही, इतर इन-मीन-तीन जिन्नस आहेत अशी बदामाची सर्वगुणसंपन्न बिस्किटे बनवायचा अलिकडे मला जणू छंदच जडला आहे. मी ही बिस्कीटे बनवायला लागले ती थोड्या योगायोगाने. असं झालं की, डिसेंबरच्या आसपास माझी एक मैत्रीण शुगर-फ्री आणि ग्लूटन-फ्री डायट करायला लागली. का? ते मला विचारू नका कारण लोक असल्या आत्मक्लेशी गोष्टी स्वेच्छेने का करतात हे मला काही समजलेलं नाहीय. म्हणजे एखाद्याला मधुमेह असेल किंवा गव्हाच्या पदार्थांचं सेवन प्रकृतीसाठी वर्ज असेल तर ते वेगळं पण फक्त वजन वगैरे घटविण्यासाठी कोणी स्वेच्छेने असल्या फंदात पडायला लागला तर मला त्याचं नवल वाटतं. तर या मैत्रिणीला हे ‘डायट’ फारच महाग पडायला लागलं आणि त्यात ख्रिसमसच्या मोसमात, जेंव्हा इतर जनता तमाम गोड पदार्थांवर तुटून पडत होती तेंव्हा तर तिचा निग्रह अजूनच डळमळीत व्हायला लागला. ती दररोज कुरकुरायची की काहीतरी गोड खावसं वाटतयं, मग आम्ही हेल्थ शॉपच्या खेपा घालायचो आणि मग ही लेबले वगैरे वाचून काहीतरी विकत घ्यायची. तेंव्हा माझ्या नजरेला ‘झायलोटॉल’ नावाचा साखरेला पर्याय म्हणून वापरला जात असलेला पदार्थ दिसला. साखरेच्या इतर पर्यायांपेक्षा हा वेगळा वाटला कारण यात काही कृत्रीम रासायनिक पदार्थ नसून ओट, बर्च वगैरे जिन्नसांच्या तंतूंपासून हे बनविले जाते अशी माहिती मिळाली. आमच्या घरात गेल्या दोन पिढ्यांपासून मधुमेह आहे म्हणून मी थोडी जास्त माहिती घेतली. शिवाय मी दरवर्षी या मोसमांत मित्रमंडळींना घरी बनविलेल्या बिस्किटांची वगैरे भेट देते पण आता या मैत्रीणीला, ती खाऊ शकेल अशी भेट देणं भाग पडलं. ‘झायलोटॉल’ विकत घेतल्याने शुगर-फ्रीची तर सोय झाली पण आता ग्लूटन-फ्री साठी काय करावे या विचारात असताना माझ्याकडे असलेल्या एका इटालियन खाद्यपदार्थांच्या पुस्तकात आमरेट्टी बिस्किटांची कृती सापडली. मग अशा प्रकारे झाली ही ‘शुगर-फ्री’ आणि ‘ग्लूटन-फ्री’ बिस्कीटे तयार आणि मैत्रीणही मनापासून खूश!

खरतरं बारा वर्षांपूर्वी पुस्तक विकत घेतलं तेंव्हापासून मला ही बिस्कीटे बनवून पहायची होती पण त्याला मुहूर्त असा लागला. आमरेट्टी बिस्किटांत बदाम, साखर आणि अंडे असे तीनच मूळ पदार्थ असतात आणि मग स्वाद वाढवायला व्हनिला किंवा बदामाचा एक्स्ट्रॅक्ट वगैरे घालतात पण तरी ही बिस्कीटे अशी मस्त हलकी, कुरकुरीत आणि स्वादिष्ट होतात की बस्स! आमचं कन्यारत्न तर ह्या बिस्किटांच्या बरणीला असं चिकटून बसतं, जसा गूळाच्या ढेपेला मुंगळा! आमरेट्टीचा उच्चार आमच्या बाईसाहेब ‘आमराटी’ असा करतात आणि त्यांच्या जिभेचं एकूण अमराठी वळण ऐकून आम्ही तर या बिस्किटांचं बारसं ‘अमराठी बिस्कीटे’ असंच केलंय.

साहित्य:

  • बदामाचे कूट २०० ग्रॅम
  • कॅस्टर साखर (किंवा साखरेला पर्यायी पदार्थ) २२५ ग्रॅम
  • दोन अंड्यांचा पांढरा भाग
  • १ चमचा व्हनीला एक्स्ट्रॅक्ट
  • २ चमचे आमरेट्टो लीक्युर (हवी असल्यास)
  • बेकिंग शीटला लावायला किंचितसे लोणी

कॅस्टर साखर न मिळाल्यास साधी साखर किंचित दळून घ्यावी पण अगदी पिठीसाखरेसारखी बारीक नव्हे तर थोडी रवाळ.

  1. प्रथम ओव्हन १६० डीग्रीला तापवून घ्यावा. बदामाच्या कुटात अर्धी साखर (शंभर ग्रॅम)  मिसळून ठेवावी. अंड्याचा पांढरा भाग वेगळा करून ‘सॉफ्ट पीक’ पर्यंत फेटून घ्यावा. नेहेमी बेकिंग करणाऱ्यांना ‘सॉफ्ट पीक’ वगैरे तांत्रिक शब्दांची कल्पना असेल पण इतरांसाठी, ‘सॉफ्ट पीक’ म्हणजे अंडे फेटताना जेंव्हा ते हलके होते आणि उचलले तर त्याचे तुरे उभे रहातात. मिश्रण हलके झाले असले तरी या स्टेजला अजून ओलसरच असते.
  2. अंड्याला ‘सॉफ्ट पीक’ आल्यानंतर, उरलेली निम्मी (शंभर ग्रॅम) साखर त्यात थोडीथोडी घालून फेटत रहावे आणि मिश्रण ‘स्टीफ पीक’ पर्यंत आणावे. ‘स्टीफ पीक’ म्हणजे फेटताना तयार झालेले तुरे स्टीफ उभे रहातात आणि अगदी भांडे उलटे केले तरी तसेच चिकटून रहातात. या स्टेजला मिश्रण थोडे कोरडे दिसते.
  3. आता मिश्रणात साखरेत मिसळून ठेवलेले बदामाचे कूट अगदी हलक्या हाताने घालून मिसळावे. याला तांत्रिक शब्द ‘फोल्ड’ करावे असा आहे. त्यात व्हनीला एक्स्ट्रॅक्ट, आमरेट्टो लीक्युर (वापरत असल्यास) वगैरे मिसळून घ्यावी आणि तयार झालेले मिश्रण एका पायपिंग बॅगमध्ये भरावे. एका बेकिंग ट्रेवर ग्रीसप्रूफ कागद घालून त्याला थोडेसे लोण्याचा हात लावावा आणि त्यावर पायपिंग करून (चकली घालतो) तसे रुपयाच्या नाण्याच्या आकाराचे गोळे घालावेत. बिस्कीटे फार मोठी केली तर आतून चिवट होतात म्हणून छोटीच ठेवावीत. दोन गोळ्यांत पुरेसे अंतर ठेवावे कारण बिस्कीटे भाजताना बरीच फुगतात. हवे असल्यास सजावटीसाठी त्यावर बदामाचे काप लावावेत.
  4.  आता बिस्किटे १५-१८ मिनिटे किंवा हलकी बदामी होईपर्यंत भाजून घ्यावीत. बाहेर काढल्यावर पाच मिनिटे ट्रेतच गार होऊ द्यावीत आणि मग हलक्या हाताने कागदापासून सोडवून घ्यावीत. ही बिस्कीटे गार होण्याआधी थोडी चिकट असल्याने कागदावरून काढताना हलक्या हाताने किंवा उलतन्याने, मोडू न देता सोडवावीत नंतर एका कूलिंग रॅकवर ठेऊन पूर्ण गार होऊन द्यावीत. गार झाल्यावर हवाबंद बरणीत भरून ठेवावीत.

Read Full Post »

Dinkache Ladoo vadyaरिव्हर कॉटेज या कार्यक्रमात एकदा या ब्रेकफास्ट बार बद्दल ऐकलं होतं. भरपूर सुका मेवा आणि ओट्स असलेले हे बार्स सकाळी गडबडीत ऑफिसला जाताना खायला चांगले वाटले म्हणून माझ्या नवऱ्याने ते करून पहिले आणि आता आमच्या घरात हे अगदी प्रचलीत झाले आहेत. हे बनवण्याची पद्धत खूपशी डिंकाच्या लाडूसारखी वाटली म्हणून मला साधारण या पद्धतीने डिंकाचे लाडू करून पहायचे होते आणि सुदैवाने नवीन उघडलेल्या एका दुकानात मला डिंकही मिळाला म्हणून मी आईला फोन केला तर तिचा पहिला प्रश्न

 “अगं पण तुमच्याकडे डिंक मिळतो का?”

माझी आईशी फोनवरची पाककृतीं वरची संभाषणं कधीकधी फार विनोदी असतात; म्हणजे असं की, संभाषण सुरु होण्याआधीच आमचा आपापला सूर ठरलेला असतो. मी फोन करावा आणि विचारवं की अमुक एक पदार्थ तू कसा करतेस? हे विचारण्याआधीच मी पुस्तकांमधून आणि जालावरून माहिती काढून ठेवलेली असते (आईवर विश्वास नाही म्हणून नव्हे तर ती अनेकदा बोलण्याच्या ओघात एखादी गोष्ट विसरते म्हणून) पण अर्थातच तिला याची कल्पना नसते त्यामुळे ती अगदी पहिल्यापासून सुरवात करते. आमच्याकडे कधी सगळे जिन्नस मिळत नाहीत म्हणून मी पर्यायी जिन्नस काय वापरावे याचाही विचार केलेला असतो पण त्याचीही आईला कल्पना नसते मग परत पहिल्यापासून सुरवात. मला त्यातल्यात्यात काहीतरी वेगळं करून पहायचं असतं पण आईच्या पद्धती अगदी शास्त्रशुद्ध असतात आणि त्यात काहीही बदल तिला अशक्यप्राय वाटतात; मग त्याच्यावर थोडी चर्चा. असं करत शेवटी तासाभराने चर्चेचा सारांश ठरविण्यात येतो आणि शेवटी मी मला जे करायचं तेच करणार ह्याची तिलाही खात्री असते. एका अर्थाने हा एका पिढीचा दुसऱ्या पिढीशी संवाद असतो. परंपरागत ज्ञान विसरायचं पण नसतं पण कालपरत्वे आणि स्थानपरत्वे फेरफार केल्याशिवाय नवीन प्रमाणेही तयार होत नसतात. आता डिंकाच्या लाडवांत संत्र्याची किसलेली साल आणि सुकवलेली क्रॅनबेरी घालते म्हटल्यावर ती काय म्हणणार आहे हे माहीत असतानाही तिला सांगण्याचा मोह काही मला आवरत नाही. कधीकधी तिची प्रतिक्रिया ऐकून गालातल्या गालात हसण्यासाठीच मी ह्या कुरापती करते असं मला वाटतं. 

डिंकाच्या लाडूसाठी आईने तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्या अश्या: सुकामेवा, खारीक पूड, खोबरे, तळलेला डिंक वगैरेचे मिश्रण जितके होईल त्याच्या एक तृतियांश प्रमाणात गूळ घ्यावा. गुळाचा पाक केल्यावर त्यात तूप घालावे आणि बाकी कोरडे पदार्थ मिसळावे. लाडू गरम असतानाच वळावेत.

यासाठी मी वापरलेले साहित्य

गूळ अर्धा किलो

डिंक १०० ग्रॅम

सुके खोबरे २५० ग्रॅम

खारीक पूड १२५ ग्रॅम

डेसिकेटेड खोबरे २ मोठे चमचे

काजू तुकडे ५० ग्रॅम

बदाम तुकडे किंवा बदामाचे काप ५० ग्रॅम

बदाम पूड ५० ग्रॅम

मनुके, बेदाणे, सुकी क्रॅनबेरी मिळून ५० ग्रॅम

खसखस ३० ग्रॅम

अर्धे जायफळ

एका संत्र्याची किसलेली साल

तूप १ कप (एकूण)

मी आधी थोड्या तुपात डिंक तळून घेतला. खोबरे खोवून ते भाजून घेतले. मी खोबरे एका बेकिंग शीटवर घालून ओव्हनमध्ये १८० डिग्रीज वर ५-६ मिनिटे भाजले. खोबरे पट्कन जळते त्यामुळे त्याच्यावर नीट डोळा ठेऊन खरपूस भाजावे. खारीक पूड करण्यासाठी त्याच्या बिया काढून तुकडे करून घेतले आणि त्यात दोन मोठे चमचे डेसिकेटेड कोकोनट घालून ते मिक्सरवर बारीक करून घेतले. डेसिकेटेड कोकोनट घातल्याने पूड चिकट न होता बारीक करता आली. ही खारीक पूड मग मी थोड्या तुपात मंद आचेवर भाजून घेतली, बदाम आणि काजूचे तुकडेही तुपावर भाजून घेतले. खसखस कोरडीच भाजून घेतली, जायफळाची पूड करून घेतली आणि संत्र्याची साल किसून घेतली. गूळ आणि तूप सोडून इतर सगळे पदार्थ एकत्र करून घेतले आणि ते एका कपने मोजले. ते साधारणत: ६ कप भरले म्हणून मी त्याच्या एक तृतियांश म्हणजे २ कप चिरलेला गूळ घेतला (जो साधारणत: अर्धा किलो भरला). गुळात २ छोटे चमचे पाणी घालून तो मध्यम आचेवर ठेऊन त्याचा पक्का पाक करून घेतला आणि आचेवरून काढून त्यात उरलेले तूप घातले. लगेचच त्यात कोरडे मिश्रण थोडे थोडे घालत मिसळले. मिश्रण गरम असतानाच त्याचे थोडे लाडू वळले (हे केले म्हणजे “आधी हाताला चटके”चा पुरेपूर प्रत्यय येतो). उरलेले मिश्रण एका छोट्या बेकिंग ट्रेवर थापले आणि ओव्हनमध्ये १८० डिग्रीज वर १० मिनिटे किंवा थोडे खरपूस दिसेपर्यंत भाजले. नंतर बाहेर काढून त्यावर सुरीने चिरा पडून ठेवल्या आणि गार झाल्यावर त्या वड्या सुट्ट्या करून ठेवल्या. माझ्या चवीला ह्या खरपूस भाजलेल्या वड्या लाडवांपेक्षा जास्त चांगल्या लागल्या. आईचे मत अर्थातच वेगळे झाले असते! 🙂

‘रुचिरा’ मधल्या कृतीत डिंकाचे प्रमाण थोडे जास्त आहे आणि त्यात बिब्ब्याच्या बियांचा वापर आहे. हे लाडू मुख्यत: बाळंतीणीला पोषक आहार म्हणून देत असल्याने त्यात या औषधी पदार्थांचा उपयोग केला जातो पण इतर वेळेस बिब्बे वापरले जातातच असे नाही आणि माझ्याकडे तर बिब्बे उपलब्धच नाहीत त्यामुळे वापरता आले नाहीत. 

Read Full Post »

काही दिवसांपूर्वी एका स्नेह्यांकडे जेवायला गेलो असताना एका स्लोव्हाकिअन मैत्रिणीने अक्रोडाच्या परंपरागत स्लोव्हाकीअन कुकीज बनवून आणल्या होत्या. चंद्रकोरीच्या आकाराच्या आणि एका बाजूने चॉकलेटमध्ये बुडवलेल्या या कुकीज खूपच सुंदर दिसत होत्या आणि त्याची चवही सुरेख होती म्हणून मी तिला कृती विचारली. तिनेही कृती अगदी व्यवस्थित लिहून वगैरे दिली पण त्यासाठी लागणारे साचे माझ्याकडे अर्थातच नव्हते म्हणून मी विचार केला की आपण नुसत्या हाताने वळून गोल बनवू; पण बरेच दिवस मी काही त्या बनवल्या नाहीत आणि नंतर मी त्याबद्दल विसरूनही गेले. माझी मैत्रीण सुट्टीला स्लोव्हाकियाला गेली आणि त्यानंतर तिला पुन्हा भेटले तेंव्हा तिने माझ्यासाठी एक भेट आणली होती, चंद्रकोरीच्या आकाराचे ते सुंदर साचे! कोणी लक्षात ठेऊन अगदी खास आवडेल अशी आणि अगदी हवी अशी भेट दिली की मला त्या व्यक्तीचं अतिशय कौतुक वाटतं. भेट देणं, मग ते विकत आणून असो किंवा स्वतः बनवून असो; हे दुसऱ्याच्या आनंदासाठी आहें हेच आपण कितीदा तरी विसरून जातो पण जेंव्हा हे अगदी बरोबर जमतं तेंव्हा देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा आनंद सारखाच असतो.

माझे नवीन साचे मला कधी एकदा वापरून पाहू असे झाले होते. कृती तर माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सोपी होती पण अक्रोडाऐवजी मी बदाम वापरायचे ठरविले कारण माझ्याकडे भरपूर बदामाचं कूट होतं आणि ते फार दिवस टिकत नाही म्हणून मला वापरून टाकायचं होतं.

या कुकीजला स्लोव्हाकीअन भाषेत Orechove Rohlicky म्हणतात; Orechove म्हणजे आक्रोड आणि Rohlicky म्हणजे रोल्स! पण मी बदाम वापरल्याने त्याला Mandľový (बदाम) Rohlicky म्हणावं लागेल. पण आम्ही त्याला ‘वॅलेरीयाच्या कुकीज’ म्हणतो (जिने मला त्या शिकवल्या).

साहित्य

अक्रोड किंवा बदामाचे कूट १२० ग्रॅम

लोणी १२० ग्रॅम (फ्रीजमध्ये गार केलेले)

मैदा १०० ग्रॅम

बेकिंग पावडर १ छोटा चमचा

पिठीसाखर २५० ग्रॅम

व्हनिला एक्स्ट्रॅक्ट १ छोटा चमचा

या कुकीज बरोबर वेलदोड्याची चव खूप छान लागते त्यामुळे व्हनिला एक्स्ट्रॅक्ट ऐवजी १ छोटा चमचा वेलदोडा पूड वापरता येईल. मी निम्म्या कुकीज वेलदोडा पूड वापरून केल्या आणि त्या मला जास्त आवडल्या.

कुकीज बनविण्यासाठी लोणी सोडून सगळे जिन्नस एकत्र करावेत आणि त्यात गार लोण्याचे छोटे तुकडे करून घालावेत. हे लोणी पिठाच्या मिश्रणाबरोबर बोटांनी चोळून एकत्र करावे. लोणी फार वितळू नये म्णून फार जास्त मळू नये आणि हात गार पाण्याने धुवून गार ठेवावेत. हे बनविण्याची पद्धत खूपशी शॉर्टक्रस्ट पेस्ट्रीसारखी आहें. मी यासाठी अजून सोपा प्रकार वापरला. फूड प्रोसेसरमध्ये सगळे जिन्नस एकत्र करून थोडेसे फिरवले. मिश्रण ब्रेडक्रम्ससारखे दिसले म्हणजे झाले असे समजावे. फार जास्त मळू नये नाहीतर कुकीज हलक्या होणार नाहीत. नंतर हे मिश्रण साच्यांमध्ये हलक्या हाताने भरावे, हे साचे नसल्यास इतर छोटे साचे वापरता येतील किवा छोटे गोळे बनवायलाही हरकत नाही पण तेही फार न मळता जमून येतील इतकेच मळावेत. ओव्हनमध्ये १८० देग्रीजला ८ ते १० मिनिटे किंवा गुलाबी रंग येईपर्यंत भाजावेत आणि बाहेर काढून ट्रेमध्येच गार होऊ द्यावेत. गार झाल्यावर साच्यांतून बाहेर काढावेत.

चॉकलेटमध्ये बुडवण्यासाठी १०० ग्रॅम डार्क चॉकलेटचे तुकडे करून ते एका गोल बुडाच्या भांड्यात घ्या आणि त्याच्या खाली बसेल अश्या एका भांड्यात थोडे पाणी घेऊन ते गरम करा. आता चॉकलेटचे भांडे पाण्याच्या भांड्यावर असे ठेवा की ज्याने त्याचा बूड पाण्यात टेकणार नाही पण त्याला वाफ मिळेल. अशा ‘बेन मरी’ पद्धतीने चॉकलेट सावकाश वितळवा आणि कुकीजचेएक टोक त्यात बुडवा. ह्या कुकीज आता वाळवण्यासाठी एका बेकिंग शीटवर टाकून १० मिनिटे किंवा चॉकलेट वाळेपर्यंत फ्रीजमध्ये ठेवा.

ह्या कुकीज बनवायला इतक्या सोप्या वाटल्या की यावेळेस बनवल्या तेंव्हा जवळजवळ सगळं काम माझ्या पिल्लानेच केलं आणि तिचे हात लागल्याने त्याची चव जरा जास्तच गोड वाटली!

Read Full Post »

डिसेम्बर महिना आला की ख्रिसमसचे वेध लागतात आणि घरात लहान मूल असले की ह्या सणाचा उत्साह द्विगुणित होतो. घरी आणलेले झाड सजविताना, वेगवेगळ्या प्रकारच्या कुकीज बनविताना आणि मुख्य म्हणजे भल्यामोठ्या सुट्ट्यांची वाट पहाताना दिवस कसे भर्रकन उडून जातात. पाच वर्षांपूर्वी ख्रिसमसच्या थोडेच दिवस आधी माझं बाळ घरी आलं होतं आणि दोन महिने आधी जन्मल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये तब्बल पाच आठवडे काढावे लागले होते; त्यामुळे तिच्या घरी येण्याचा आनंद साजरा करण्यासाठी जणू आम्हाला ख्रिसमसचे निमित्त मिळाले होते. त्याच वर्षीपासून मग आमच्या घरी साग्रसंगीत ख्रिसमसच्या नवीन परंपरा सुरू झाल्या. दरवर्षी ही तयारी करत असताना माझ्या बछड्याचा आनंद अगदी ओसंडून वहात असतो जो पाहून मला लहानपणी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आईच्या मागेमागे करून फराळाची तयारी पहाताना, बाबांबरोबर आकाशदिवा बनवताना जी मजा यायची त्याची आठवण होते.

यावर्षी मी झाडावर टांगण्यासाठी स्टेन्डग्लास कुकीज बनवायचे ठरविले होते. नुसत्याच सजावटीच्या गोष्टी टांगण्याऐवजी सुंदर खाऊ लावला तर मुलांना येताजाता तोंडातही टाकता येतो आणि आपल्याला घरी बनवलेल्या गोष्टींची सजावट केल्याचे समाधानही वाटते. स्टेन्डग्लास कुकीज म्हणजे कुकीजच्या मधल्या भागात काही आकार कापून त्यात पारदर्शी साखरेच्या गोळ्यांचा रंगीत पापुद्रा बनवायचचा. टांगल्यानंतर या रंगीत पारदर्शी पापुद्र्यातून प्रकाश येतो आणि कुकीज अगदी स्टेन्डग्लास सारख्या दिसतात. कुकीजसाठी कोणतीही कृती वापरता आली असती पण मी जिंजरब्रेडची कृती वापरली कारण त्यांच्या गडद तपकिरी रंगावर इतर रंग खुलून दिसतात आणि आल्याच्या स्वादाच्या या कुकीज ख्रिसमसच्या थंड दिवसांत खायला मस्त मजा येते. 

साहित्य

४०० ग्रॅम मैदा (३ मोठे कप भरून)

११२ ग्रॅम (अर्धापावशेर) लोणी किंवा बटर

१०० ग्रॅम साखर

१५० मिली मोलॅसिस

१ चमचा खाण्याचा सोडा

२ चमचे सुंठ

१ चमचा दालचिनीची पूड

पाव चमचा लवंगाची पूड

पाव चमचा जायफळाची पूड

दोन चिमूट मीठ

एक अंडे

१०-१२ साखरेच्या रंगीत गोळ्या (कॅंडी) फोडून.

प्रथम लोणी आणि साखर एकत्र करून फेटावी, यासाठी इलेक्ट्रिक हॅंडमिक्सर असल्यास उत्तम पण नसेल तर हातानेही फेटता येईल.  हे मिश्रण चांगले हलके झाले की मग त्यात अंडे आणि मोलॅसिस घालून अजून फेटावे. भारतात मोलॅसिस मिळते कि नाही ते माहीत नाही पण नसेल तर गूळ किंवा काकवीही वापरता येईल. त्याने रंग छान गडद येतो आणि चवही खमंग येते जी सुंठीमुळे अजुनच छान लागते. एकीकडे मैदा, सोडा, मसाल्याची पूड आणि मीठ एकत्र चाळून घ्यावे. नंतर ओल्या मिश्रणात हे पीठ घालून गोळा होईपर्यंत मिसळावे. हा गोळा आता व्यवस्थित झाकून फ्रीजमध्ये कमीतकमी तासभर ठेवावा म्हणजे लाटायला सोपा जाईल. ओव्हन १८० डेग्रीला तापवून घ्या. नंतर गार झालेल्या गोळ्याचे चार भाग करून घ्यावेत आणि एकेक भाग साधारणतः अर्धा सेंटीमीटर जाडीचा लाटून घ्यावा. आता आपल्याला हव्या त्या आकाराच्या कुकीज कापून त्या एका बेकिंग शीटवर अल्युमिनियंमचा कागद पसरून त्यावर टाकाव्यात. अल्युमिनियंमचा कागद महत्वाचा आहें कारण नाहीतर वितळलेली कॅंडी चिकटेल आणि निघून येणार नाही. आता ह्या कुकीजचा मधला भाग दुसऱ्या छोट्या आकाराच्या साच्याने कापावा आणि काढून टाकावा. नंतर या रिकाम्या भागात फोडून घेतलेल्या रंगीत कॅंडीचे तुकडे टाकावेत आणि एका स्ट्रॉने वरच्या बाजूला एक छिद्र करावे (ह्याचा उपयोग नंतर दोरा ओवायला होईल). ओव्हनमध्ये कुकीज ६-७ मिनिटे किंवा व्यवस्थित शिजेपर्यंत भाजाव्यात. बाहेर काढल्यानंतर त्याच शीटवर त्या गार होऊ द्याव्यात आणि नंतरच काढायचा प्रयत्न करावा. पूर्ण गार झाल्यावर रॉयल आयसिंगने ह्या कुकीजला सजवावे. मी रॉयल आयसिंगसाठी खालील कृती वापरते.

एका अंड्याचा पांढरा भाग

१५० ग्रॅम दळलेली साखर

१ चमचा लिंबाचा रस 

अंड्याचा पांढरा भाग आणि लिंबाचा रस एकत्र करून फेटावा आणि त्यात हळूहळू सगळी साखर मिसळावी आणि मिश्रण अगदी चकचकीत होईपर्यत फेटावे. हे आयसिंग फार पटकन सुकते म्हणून लगेच एका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावे. आता मेंदीचा कोन करतो तसा करून त्यात हे आयसिंग भरून कुकीज सजवाव्यात. आयसिंग पूर्ण वाळेपर्यंत थांबावे आणि मग कुकीज हवाबंद डब्यात भरून ठेवाव्या.

Read Full Post »