Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for ऑक्टोबर, 2012

पुन्हा स्थलांतर. नवा खंड, नवे हवामान, नवे लोक, नव्या पद्धती आणि नव्या खाद्यसंस्कृती. जुन्यातून पाय निघत नाहीय आणि नव्यात अजून पूर्ण सामावून जाता येत नाही अशी काहीशी दोलनामय, अस्वस्थ मनोवस्था. खरंतर वयाच्या वेगळ्या वळणावर हे सारे मोठे बदल किती रोमांचक वाटायचे, उत्साहाने स्वीकारले जायचे! नवीन वातावरणात सामावून जायची, जे हातून सुटले त्याबद्दल हुरहूरण्याऐवजी जे हाती लागले त्याच्या नवलाईने हरखून जायची मानसिकता वयानुसार बदलत असावी बहुतेक! पण आता या वळणावर, या स्थलांतरात, हातातले काहीच सुटू नये असे वाटतेय (जे अशक्यच आहे), म्हणूनच ही थोडीशी उदासीनता.

पाणी जड आहे, दूध-दह्याला फारशी चव नाही, ओळखीचे जिन्नस दुकानाच्या फडताळांवर सापडत नाहीत, बाहेर खायला गेले तर भल्यामोठ्या आकारमानाचे अतिसुमार किंवा अतिबेचव पदार्थ, घरी स्वयंपाक करायला लागणारी सगळी उपकरणे अजून जहाजाने आली नाहीत, एक ना अनेक तक्रारी. खरंतर सर्वात तापदायक होतो तो म्हणजे स्वत:चा हा तक्रारखोरपणा पण ‘नाराजी लपवायची आणि हसतमुखाने नवीन आव्हाने झेलायची’ वगैरेसाठी जो जन्मजात समजूतदारपणा लागतो तो आमच्याकडे अंमळ कमीच! म्हणून मग, ‘आपल्याकडे’ ‘हे’ जास्त चांगलं मिळायचं आणि इथल्या ‘ह्या’ला चवच नाही वगैरे निष्कर्ष काढत चिडचिड करायची. गंमत अशी की इतक्या स्थलांतरांनंतर ‘आपल्याकडे’ या शब्दाची व्याख्या दर मिनिटाला बदलते याची जाणीवही दर मिनिटाला होत असते.

मग एके दिवशी सुपरमार्केटमध्ये भाजीच्या रांगेत ‘टोमॅटिलो’ दिसतात. इतके दिवस केवळ पुस्तकात आणि जालावरच्या चित्रात पाहिलेले हे टपोरे, आंबटसर फळ हातात येते आणि अंगात उत्साह संचारतो, करून पहायच्या असलेल्या कितीतरी कृती आठवतात, नाराजी कुठल्याकुठे पळून जाते आणि ‘नवीन ठिकाणी नवीन जिन्नस, नवी खाद्यसंस्कृती’ ही साधीसोपी गोष्ट हळूहळू पचनी पडते. थोड्याच दिवसांत फार्मर्स मार्केटचाही शोध लागतो आणि तिथे गेल्यावर तर मग स्थानिक भाजीपाला, फळफळावळ यांची विविधता पाहून तर डोळ्यांत अक्षरशः पाणी येतं. ही अतिशयोक्ती नव्हे, पण सुपीक जमिनीतून आलेली रसरशीत समृद्धी पहाणे आणि त्याचा उपभोग घेण्याची ऐपत असण्याइतके भाग्यवान आपण आहोत ही भावना मला भावविवश करायला पुरेशी आहे. मग विक्रेत्यांशी थोड्या गप्पा, भरलेल्या पिशव्या आणि पोटात थोडे चविष्ट पदार्थ गेल्यावर मी माणसात येते आणि झपाटल्यासारखी  स्वयंपाकघरात घुसते. दरम्यानच्या काळात जहाजाने सामानही येतं आणि घर, घर वाटायला लागतं. आपल्याला आनंदी रहायला इतक्या गोष्टी लागतात याची किंचित अपराधी टोचणीही लागते पण आवडत्या कपातून चहा पिताना ती विसरूनही जाते.

अनेक नवीन पदार्थ बनवून पाहिले पण इथे आल्याआल्या विमानतळावरच ज्या मेपल क्रीम कुकीज मला बेहद्द आवडल्या होत्या त्या बनवायला जी मजा आली ती वेगळीच! मेपल सिरपच्या गोडीत जो खमंगपणा आणि स्वाद आहे त्याचा दुहेरी उपयोग या बिस्किटांत केला जातो. कुकीज बनविताना त्यात ब्राऊन साखरेच्या जोडीने वापरलेले मेपल सिरप आणि आतल्या क्रीमच्या सारणात वापरलेले मेपल सिरप या दोन्हीमुळे जिभेवर रेंगाळत रहाणारी चव म्हणजे या नवीन देशाने मला दिलेली ‘प्रतिकात्मक’ गोड भेटच आहे.

साहित्य (कुकीजसाठी):

२२५ ग्रॅम लोणी

२०० ग्रॅम ब्राऊन साखर

१२५ मिली मेपल सिरप

२ चमचे मेपल एक्स्ट्रॅक्ट

१ अंडे

अर्धे जायफळ किसून

३२५ ग्रॅम मैदा

२ चमचे बेकिंग पावडर

पाव चमचा मीठ

साहित्य (मेपल क्रीमसाठी):

४ मोठे चमचे लोणी

१ कप (१२५ ग्रॅम) आयसिंग/दळलेली साखर

२ मोठे चमचे मेपल सिरप

प्रथम लोणी फ्रीजमध्ये असल्यास बाहेर काढून मऊ होईपर्यंत ठेवावे.

मैदा, मीठ, बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यावे आणि त्यात किसलेले जायफळ मिसळावे.

लोणी आणि साखर एकत्र करून हलके होईपर्यंत फेटावे.

त्यात मेपल सिरप घालून पुन्हा फेटावे.

मैद्याचे मिश्रण त्यात मिसळावे व तयार झालेल्या पिठाचे दोन गोळे करून फ्रीजमध्ये दोन तास ठेवावेत.

ओव्हन १८० डीग्रीजला तापवून घ्यावा.

मिश्रण लाटण्याने लाटून हव्या त्या आकारात कापावे, मेपल पानाचा आकार मिळाला तर उत्तमच.

कुकीज ओव्हनमध्ये ८-१० मिनिटे किंवा किंचीत सोनेरी होईपर्यंत भाजून काढाव्यात.

बाहेर काढल्यावर कुकीज थोड्यावेळ (३-४ मिनिटे) बेकिंग ट्रेवरच गार होऊ द्याव्यात आणि नंतर कूलिंग रॅकवर काढून गार होऊ द्याव्यात.

क्रीमच्या मिश्रणासाठी लोणी फेटून घ्यावे व त्यात मेपल सिरप आणि आयसिंग साखर घालून मिश्रण एकत्र येईपर्यंत फेटावे.

गार झालेल्या कुकीजवर थोडे क्रीमचे मिश्रण लावून त्यावर दुसरी कुकी ठेवावी व हलकेच दाबावे.

क्रीमचे मिश्रण न घालतादेखिल या कुकीज पुरेश्या गोड, खुसखुशीत आणि चविष्ट लागतात.

कृतीसाठी या  आणि या  दोन्ही ब्लॉगवरील माहिती वाचली आणि त्या आधारे किंचित फरक करून प्रमाण वापरले.

Advertisements

Read Full Post »