Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for जानेवारी, 2012

ऑयस्टर, कालव, Oysterसमुद्रापासून दूर आत देशावर लहानपण गेल्याने माझा जलचरांशी फारसा संबंध आलाच नाही. तरी नाही म्हणायला काही दिवस पापलेट किंवा सुरमई बाजारात यायची पण इतर वेगळे मासे, कोळंबी, तिसऱ्या, कालव, समुद्री खेकडे असलं फारसं काही दिसायचं नाही. माझं एकूण मासे आणि इतर समुद्री जलचरांबद्द्लचं ज्ञान यथातथाच होतं पण त्याबद्दल कुतूहल वाढायला आणि प्रेम निर्माण व्हायला तीन ‘देशपांडे’ कारणीभूत आहेत. लहानपणी देशपांडे आज्जींच्या घरी तळलेली मच्छी खाऊन जीभ तयार झाली आणि त्या जितक्या आत्मीयतेने या समुद्री मेव्याबद्दल बोलायच्या त्यामुळे बरंच कुतूहलही निर्माण झालं. पुढे मांजराच्या जमातीत मोडणाऱ्या (मासे पाहिले की जीभ चाटणाऱ्या) ‘देशपांडे’ नामक प्राण्याला मासे खूप आवडतात म्हणून हौसेने रांधायला लागले. सिंगापोरमध्ये तर ताजी मच्छी आणि इतरही विविध प्रकारचे जलचर मिळायचेही मुबलक. थोडेसे काहीतरी म्हणून आणायला बाजारात जायचे आणि पिशव्या भरून मासे आणायचे हा प्रकार नेहमीच घडायचा. त्यावेळी माझ्या घरासमोरच राहणाऱ्या अजून एका ‘देशपांडें’ नामक सुगरणीकडून ताजा मासा कसा ओळखायचा यापासून ते कोलंबी कशी सोलायची वगैरे बरेच काही शिकले आणि या विषयावर त्या माझ्या शिक्षिका झाल्या. एकदा उत्साहाने बाजारातून जिवंत खेकडे आणले खरे पण नंतर त्यांना परलोकी कसं पाठवायचं अशी ‘सीफूड इर्मजन्सी’ तयार झाली. बावरून त्यांना फोन केल्यावर त्यांनी फोनवरच अगदी अचूकपणे कुठे घाव घालायचा, खेकडे वळवळायचे थांबल्यावर साफ कसे करायचे वगैरे सगळी माहिती अगदी सविस्तर सांगितली आणि माझी वेळ निभावली.

हळूहळू सरावाने खूप वेगवेगळ्या प्रकारचे सीफूड खायला, साफ करायला आणि रांधायला शिकले पण का कोण जाणें ‘कालव’ (ऑयस्टर) हा प्रकार अनेक दिवस खाल्ला नव्हता. ऑयस्टर सॉसही स्वयंपाकात वापरायचे पण ऑयस्टर कधी खाल्ला नव्हता. पण या उन्हाळ्यात एकदा फिरायला गेलो असताना लोक एका ठेल्यावर छत्रीखाली बसून कच्चे ऑयस्टर खाताना पहिले आणि मलाही ते खाऊन पहायची इच्छा झाली. ताजे ऑयस्टर एक माणूस अगदी सफाईने उघडत होता आणि लोक त्यावर लिंबू किंवा टोबॅस्को सॉस टाकून खात होते. मी व्हाईट वाइनच्या ग्लासबरोबर हे ऑयस्टर नुसते काही न घालता, लिंबू पिळून आणि टोबॅस्को सॉस टाकून अशा तिन्ही प्रकारे खाऊन पहिले. नुसते खाल्ल्यावर याला ‘समुद्रफळ’ म्हणून का संबोधतात ते समजले; समुद्राची एकवटलेली खारी चव जणू एका फळाच्या रूपात खातो आहे असे वाटते. त्यावर टोबॅस्को सॉसचे दोनच थेंब टाकल्याने चवीत किती अमूलाग्र बदल होतो तेही लक्षात आले. ऑयस्टर मुळातच खारट असल्याने त्यात आंबट आणि तिखट गोष्टी घातल्यास त्याची चव वाढते त्यामुळे मला एकदम अनेक शक्यता दिसायला लागल्या आणि स्वतःच हे प्रयोग करून पहावेसे वाटले. यात फक्त एकच अडचण होती की घरी आणल्यावर ते उघडायचे कसे? Oyster Openerटीव्हीवर अनेकांना ऑयस्टर उघडण्याच्या प्रयत्नांत हात कापून घेऊन रक्तबंबाळ झालेले पहिले असल्याने ह्या प्रकाराबद्दल जरा शंकाच होती पण सुदैवाने हात शाबूत ठेऊन ऑयस्टर उघडण्याचे एक नवीन अस्त्र मिळाल्याने तीही अडचण दूर झाली.प्रत्यक्ष उघडताना मात्र ह्या प्राण्याच्या स्वतःचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या जणू अभेद्य भिंतीचा अनुभव आला. एकच कमजोर जागा पण तिथेही अगदी ताकदीने सुरी किंवा तत्सम अवजाराने छिद्र पडून मग ती विशिष्ट प्रकारे फिरवल्यावर हा शिंपला उघडतो. पण ही सारी लढाई करताना या जलचराच्या संरक्षक रचनेला दाद द्यावीशी वाटते. ऑयस्टरचे विकीपेज सांगते की झिंक, लोह, कॅल्शियम, सेलेनियम वगैरे आवश्यक धातू ज्यात मुबलक प्रमाणात असतात असा हा ऑयस्टर कच्चा खाणं प्रकृतीसाठी सर्वात उत्तम  आहे. झिंकच्या या मुबलक प्रमाणामुळेच बहुतेक याचा Aphrodisiac म्हणूनही उल्लेख होत असावा. ऑयस्टरवर घालायला मी दोन प्रकारचे ड्रेसिंग…खरंतर चटण्याच बनविल्या.

 हिरवी चटणी

१०-१२ पुदिन्याची पाने, कोथिंबीरीच्या २-३ काड्यां, १ हिरवी मिरची, आल्याचा अर्धा इंच तुकडा बारीक किसून, लिंबाचा रस लागेल त्या प्रमाणात आणि मीठ चवीनुसार .

लाल चटणी

वूस्टर सॉस १ चमचा, टोबॅस्को सॉस चार पाच थेंब किंवा चवीनुसार, टोमॅटोचा रस १ मोठा चमचा, रेड वाईन व्हिनेगर १ चमचा, चिमुटभर साखर, बारीक चिरलेला कांदा १ चमचा, टोमॅटोचे बारीक चिरलेले तुकडे १ चमचा आणि मीठ चवीनुसार.

हिरव्या चटणीसाठी मिरचीच्या बिया काढून व इतर सारे साहित्य एकत्र करून दगडीत घालून बारीक केले आणि थोडा-थोडा लिंबाचा रस घालत मिश्रण थोडे पातळ केले. लाल चटणीसाठी वरील सगळे साहित्य एकत्र केले. ऑयस्टर उघडल्यावर वरीलपैकी एक-एक चटणी त्यावर टाकून तसेच तोंडात टाकले. चटण्या मस्त झणझणीत असल्याने ठसका लागला खरा पण असे कच्चे खाऊन पहिल्याने ऑयस्टरची आणि माझी मस्त ओळख पटली. आता तळून, भाजून, शिजवून, मसाले वापरून ऑयस्टरचे पदार्थ बनवून पहायला मी तयार आहे.

Advertisements

Read Full Post »

Dinkache Ladoo vadyaरिव्हर कॉटेज या कार्यक्रमात एकदा या ब्रेकफास्ट बार बद्दल ऐकलं होतं. भरपूर सुका मेवा आणि ओट्स असलेले हे बार्स सकाळी गडबडीत ऑफिसला जाताना खायला चांगले वाटले म्हणून माझ्या नवऱ्याने ते करून पहिले आणि आता आमच्या घरात हे अगदी प्रचलीत झाले आहेत. हे बनवण्याची पद्धत खूपशी डिंकाच्या लाडूसारखी वाटली म्हणून मला साधारण या पद्धतीने डिंकाचे लाडू करून पहायचे होते आणि सुदैवाने नवीन उघडलेल्या एका दुकानात मला डिंकही मिळाला म्हणून मी आईला फोन केला तर तिचा पहिला प्रश्न

 “अगं पण तुमच्याकडे डिंक मिळतो का?”

माझी आईशी फोनवरची पाककृतीं वरची संभाषणं कधीकधी फार विनोदी असतात; म्हणजे असं की, संभाषण सुरु होण्याआधीच आमचा आपापला सूर ठरलेला असतो. मी फोन करावा आणि विचारवं की अमुक एक पदार्थ तू कसा करतेस? हे विचारण्याआधीच मी पुस्तकांमधून आणि जालावरून माहिती काढून ठेवलेली असते (आईवर विश्वास नाही म्हणून नव्हे तर ती अनेकदा बोलण्याच्या ओघात एखादी गोष्ट विसरते म्हणून) पण अर्थातच तिला याची कल्पना नसते त्यामुळे ती अगदी पहिल्यापासून सुरवात करते. आमच्याकडे कधी सगळे जिन्नस मिळत नाहीत म्हणून मी पर्यायी जिन्नस काय वापरावे याचाही विचार केलेला असतो पण त्याचीही आईला कल्पना नसते मग परत पहिल्यापासून सुरवात. मला त्यातल्यात्यात काहीतरी वेगळं करून पहायचं असतं पण आईच्या पद्धती अगदी शास्त्रशुद्ध असतात आणि त्यात काहीही बदल तिला अशक्यप्राय वाटतात; मग त्याच्यावर थोडी चर्चा. असं करत शेवटी तासाभराने चर्चेचा सारांश ठरविण्यात येतो आणि शेवटी मी मला जे करायचं तेच करणार ह्याची तिलाही खात्री असते. एका अर्थाने हा एका पिढीचा दुसऱ्या पिढीशी संवाद असतो. परंपरागत ज्ञान विसरायचं पण नसतं पण कालपरत्वे आणि स्थानपरत्वे फेरफार केल्याशिवाय नवीन प्रमाणेही तयार होत नसतात. आता डिंकाच्या लाडवांत संत्र्याची किसलेली साल आणि सुकवलेली क्रॅनबेरी घालते म्हटल्यावर ती काय म्हणणार आहे हे माहीत असतानाही तिला सांगण्याचा मोह काही मला आवरत नाही. कधीकधी तिची प्रतिक्रिया ऐकून गालातल्या गालात हसण्यासाठीच मी ह्या कुरापती करते असं मला वाटतं. 

डिंकाच्या लाडूसाठी आईने तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्या अश्या: सुकामेवा, खारीक पूड, खोबरे, तळलेला डिंक वगैरेचे मिश्रण जितके होईल त्याच्या एक तृतियांश प्रमाणात गूळ घ्यावा. गुळाचा पाक केल्यावर त्यात तूप घालावे आणि बाकी कोरडे पदार्थ मिसळावे. लाडू गरम असतानाच वळावेत.

यासाठी मी वापरलेले साहित्य

गूळ अर्धा किलो

डिंक १०० ग्रॅम

सुके खोबरे २५० ग्रॅम

खारीक पूड १२५ ग्रॅम

डेसिकेटेड खोबरे २ मोठे चमचे

काजू तुकडे ५० ग्रॅम

बदाम तुकडे किंवा बदामाचे काप ५० ग्रॅम

बदाम पूड ५० ग्रॅम

मनुके, बेदाणे, सुकी क्रॅनबेरी मिळून ५० ग्रॅम

खसखस ३० ग्रॅम

अर्धे जायफळ

एका संत्र्याची किसलेली साल

तूप १ कप (एकूण)

मी आधी थोड्या तुपात डिंक तळून घेतला. खोबरे खोवून ते भाजून घेतले. मी खोबरे एका बेकिंग शीटवर घालून ओव्हनमध्ये १८० डिग्रीज वर ५-६ मिनिटे भाजले. खोबरे पट्कन जळते त्यामुळे त्याच्यावर नीट डोळा ठेऊन खरपूस भाजावे. खारीक पूड करण्यासाठी त्याच्या बिया काढून तुकडे करून घेतले आणि त्यात दोन मोठे चमचे डेसिकेटेड कोकोनट घालून ते मिक्सरवर बारीक करून घेतले. डेसिकेटेड कोकोनट घातल्याने पूड चिकट न होता बारीक करता आली. ही खारीक पूड मग मी थोड्या तुपात मंद आचेवर भाजून घेतली, बदाम आणि काजूचे तुकडेही तुपावर भाजून घेतले. खसखस कोरडीच भाजून घेतली, जायफळाची पूड करून घेतली आणि संत्र्याची साल किसून घेतली. गूळ आणि तूप सोडून इतर सगळे पदार्थ एकत्र करून घेतले आणि ते एका कपने मोजले. ते साधारणत: ६ कप भरले म्हणून मी त्याच्या एक तृतियांश म्हणजे २ कप चिरलेला गूळ घेतला (जो साधारणत: अर्धा किलो भरला). गुळात २ छोटे चमचे पाणी घालून तो मध्यम आचेवर ठेऊन त्याचा पक्का पाक करून घेतला आणि आचेवरून काढून त्यात उरलेले तूप घातले. लगेचच त्यात कोरडे मिश्रण थोडे थोडे घालत मिसळले. मिश्रण गरम असतानाच त्याचे थोडे लाडू वळले (हे केले म्हणजे “आधी हाताला चटके”चा पुरेपूर प्रत्यय येतो). उरलेले मिश्रण एका छोट्या बेकिंग ट्रेवर थापले आणि ओव्हनमध्ये १८० डिग्रीज वर १० मिनिटे किंवा थोडे खरपूस दिसेपर्यंत भाजले. नंतर बाहेर काढून त्यावर सुरीने चिरा पडून ठेवल्या आणि गार झाल्यावर त्या वड्या सुट्ट्या करून ठेवल्या. माझ्या चवीला ह्या खरपूस भाजलेल्या वड्या लाडवांपेक्षा जास्त चांगल्या लागल्या. आईचे मत अर्थातच वेगळे झाले असते! 🙂

‘रुचिरा’ मधल्या कृतीत डिंकाचे प्रमाण थोडे जास्त आहे आणि त्यात बिब्ब्याच्या बियांचा वापर आहे. हे लाडू मुख्यत: बाळंतीणीला पोषक आहार म्हणून देत असल्याने त्यात या औषधी पदार्थांचा उपयोग केला जातो पण इतर वेळेस बिब्बे वापरले जातातच असे नाही आणि माझ्याकडे तर बिब्बे उपलब्धच नाहीत त्यामुळे वापरता आले नाहीत. 

Read Full Post »

गेल्या काही दिवसांपासून आमच्या घरावर फ्रेडीचं राज्य आहे. दिवसरात्र सारेजण या राजाच्या पुढेमागे करत असतात. फ्रेडीला गाजर द्या, फ्रेडीला गवत द्या, फ्रेडीला बाहेर घेऊन जा, फ्रेडीचं घर साफ करा, फ्रेडीशी खेळा, फ्रेडी कंटाळला असेल, फ्रेडीला बरं नसेल…फ्रेडी हे आणि फ्रेडी ते. खरं तर हा आमचा दोन आठवड्याचा पाहुणा पण आता तो पुरता घरचा बनून गेला आहे. आमचा एक मित्र ख्रिसमससाठी कुटुंबासहित पोलंडला गेला आणि जाताना थोडे दिवसांसाठी त्याच्या सशाला आमच्याकडे सोडून गेला. पांढराशुभ्र रंग, काळे कान आणि डोळ्यांवर आणि गालावर दोन काळे ठिपके असलेला फ्रेडी म्हणजे अगदी मदनाचा पुतळा आणि  स्वच्छतेचा भोक्ता आहे. दिवसांतून चार वेळा स्वत:ला चाटून-चाटून साफ करतो आणि आपले सगळे विधी आपल्या पिंजऱ्यातच उरकतो. शिवाय हा गडी इतर सशांसारखा बिलकुल भिडस्त नाही, जवळ येऊ देतो, त्याच्या मऊशार मखमलीवर हात फिरवू देतो, आणि रंगात आला की मस्त पकडापकडीचा खेळ खेळतो. एरवी सुट्ट्यांमध्ये अगदी कंटाळून जाणारी माझी पोर यावेळेस मात्र फ्रेडीच्या मागेमागे धावत सुट्या अगदी मनापासून उपभोगतेयं. हे चालतं-फिरतं, जिवंत खेळणं कोणालाही वेडं करेल मग लहान मुलांची काय बात!

याच फ्रेडीमुळे मला अजून एक अनपेक्षित प्रेरणा मिळाली. माझी आई विणकामात अगदी निष्णात आहे आणि ‘धागेदोरे’ या ब्लॉगवर ‘रॅव्लरी’ या विणकामाबद्दलच्या स्थळाविषयी वाचल्यापासून मला तिला काही नमुने दाखवायचे होते. म्हणून मी सहज चाळत असताना तिथे हा एग कोझी ससा माझ्या आणि माझ्या मुलीच्या दृष्टीस पडला. तो पहिल्यापासून ही बया माझ्यामागे लागली की आजीला विणायला सांगू आणि तिचा उत्साह पाहून मला वाटले की आपणच हा प्रयत्न करून पाहू. खरंतर मला विणकामाचा बिलकुल छंद नाही; लहानपणापासून आईकडे शिकायला बऱ्याच जणी येत असत आणि आई त्यांना उत्साहाने शिकवत असे पण माझ्यात ही आवड निर्माण करण्यात मात्र आईला काही यश आले नाही. दोन-दोन तास डोकं खाली घालून विणल्यावर समजणार की वीस ओळींपूर्वी चूक झाली होती, मग काढा सगळं उसवून! शिवाय आई समोरच असल्याने तिच्या असंख्य सूचना सुरू…धागे फार ओढू नकोस, सैलसरच ठेव, हे नीट नाही झालं, ते असं कर… या सगळ्या प्रकारात लोक छंद म्हणून का विणायला घेतात ते मला कधीच कळले नाही. पण तरी ख्रिसमसची भेट म्हणून पिल्लाला स्वत: विणलेला ससा देण्याचा मोह मला टाळता आला नाही. ज्युलीच्या Little Cotton Rabbits या ब्लॉगवरून नमुना विकत घेतल्यावर तिने अगदी व्यवस्थित लिहिलेला आणि पद्धतशीर माहिती असलेला नमुना पाठविला पण तरी अनेक वर्षं काहीच विणलेलं नसल्याने अनेक शंका आल्या. सुदैवाने http://www.knittinghelp.com/ या उत्तम स्थळावर विणकामासंबंधी अनेक चित्रफिती आहेत ज्याचा मला अतिशय उपयोग झाला. ही भेट मुलीच्या डोळ्याआड पूर्ण करायची असल्याने रात्री ती झोपल्यानंतरच लोकरीला हात लावता यायचा. चुकत-शिकत शेवटी हा ससा तयार झाला आणि तो बनवताना माझ्याही नकळत मला खूप मजा आली. तो दिसतोयही बरा आणि ही भेट मिळाल्यानंतरचा पिल्लाचा फुललेला चेहेरा ही माझ्यासाठीच भेट होती. पण ही पोरटी मला म्हणते कशी “इतका सुंदर ससा आजीने विणून पोस्टाने पाठविला का”? त्याचं नाव काय ठेवायचं हा प्रश्न काही कोणाला पडलाच नाही; खरा फ्रेडी त्याच्या घरी गेला की त्याची आठवण म्हणून हा लोकरी फ्रेडी आमच्यापाशी नेहमी राहील.

पण खरा फ्रेडी परत गेल्यावर आमचं घर मात्र सुनंसुनं होणार. मग आमच्या केबल्स कोण कुरतडणार, खिडकीत ठेवलेलं माझं हर्ब गार्डन कोण खाणार आणि आपल्या मखमली स्पर्शाने आमच्या पायापायात कोण घुटमळणार?

Read Full Post »