Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for नोव्हेंबर, 2011

माझ्या घरासमोरच्या हिरवळीवर आठ-दहा सफरचंदासारखी दिसणारी झाडे आहेत. दर उन्हाळ्यात ती सुंदर फुलांनी नाहतात आणि शिशिरात फळांनी लहडतात. छोट्या बोराच्या आकाराची ही फळे हुबेहूब सफरचंदासारखीच दिसतात पण ही सफरचंदे नव्हेत. पहिल्याच वर्षी इथे राहायला आल्यावर ही फळे खाऊन पहाण्याचा मोह अनावर झाला पण विषारी तर नसतील ना अशी शंकाही आली. आजूबाजूच्या रहिवाश्यांनाही काही कल्पना नव्हती म्हणून शेवटी मी एक खाऊन पहिले. चवही साधारणतः सफरचंदासारखीच पण किंचित तुरट! मला काही विशबाधा वगैरे झाली नाही याची खात्री झाल्यावर मग नवऱयानेही खाऊन पहिले. (त्यावरून एक विनोद आठवला, नवरा काहीतरी विजेवर चालणाऱ्या उपकरणाची दुरुस्ती करत असतो. मधूनच बायकोला बोलावतो आणि एक केबल हातात पकडायला सांगतो आणि लगेचच म्हणतो “झाले आता जा.” मग ती विचारते “अहो मला फक्त एवढ्यासाठी बोलावलत?” त्यावर तो उत्तरतो “अगं, जवळ टेस्टर नव्हता आणि ही केबल लीक होतेय का ते पहायचे होते म्हणून तुला बोलावले.”…..असो, विषयांतर….!) नंतर मला कोणीतरी सांगितले की त्यांना ‘क्रॅब ऍपल्स’ म्हणतात आणि त्याची जेली चांगली होते. दरवर्षी झाडे भरगोस लगडतात, अगदी मण्यांनी सजवल्यासारखी दिसतात आणि तरी त्यांना कोणी हातही लावत नाही. शेवटी फळे सुकून गळून जातात. यावर्षी तर त्यांचा बहर अगदी ओसंडून वाहतोय म्हणून मी जेली करून पहायची ठरवली.

मी आणि माझ्या पिल्लाने मिळून हाताला येतील अशी अगदी सहजपणे दहा पंधरा मिनिटात दोन किलो फळे तोडली. धुवून घेतल्यावर मग अर्धी चिरली आणि मग साधारणतः फळे जेमतेम बुडतील एवढ्या पाण्यात शिजवायला ठेवली. पंधरा वीस मिनिटातच फळे मऊ शिजली. मग रात्रभर ही शिजलेली फळे चक्का टांगावा तशी टांगली आणि त्याच्यातून गळून आलेला रस एका भांड्यात गोळा केला. सकाळी चोथा माझ्या कंपोस्टरमधे रिकामा केला आणि रस मोजून घेतला. साखर रसाच्या ७/१० प्रमाणात मोजून घेतली आणि रसाबरोबर मिसळून शिजवायला ठेवली. चवीला त्यात दोन बदामफुले (स्टार अनीस) टाकली आणि साखर रसामध्ये पूर्ण विरघळेपर्यंत बारीक आचेवर आणि उकळी आल्यानंतर मोठ्या आचेवर जेली उकळत ठेवली. जेली जमत आल्यावर निर्जंतुक केलेल्या काचेच्या बरण्यांमध्ये गरमच भरली आणि लगेचच झाकून टाकली. कृती मी या ठिकाणाहून घेतली आहे पण जालावर इतरही अनेक प्रकारच्या कृती आहेत.  

(टीप: जेली जमते कि नाही याची खात्री करण्यासाठी फ्रीझरमध्ये गोठवलेली एक काचेची थाळी घ्यावी आणि त्यावर एक जेलीचा थेंब टाकून त्याला बोटाने किंचित सरकवून पहावा. जर त्याला सुरकुत्या पडल्या तर जेली जमली असे समजावे.)

साधारणतः एक-दोनवेळा जॅम किंवा जेली केल्यावर या सगळ्या गोष्टींचा चांगला अनुभव येतो आणि नुसत्या दाटपणावरूनही जेली जमेल का याची कल्पना येते. जालावर आणि विशेषतः यूट्यूबवर जॅम बनवण्यावर इतकी माहिती आहे कि थोडा अभ्यास केला तरी  अगदी पहिल्या वेळेसही हमखास यश मिळते. जॅम किंवा जेली जमण्यासाठी पेक्टीनची गरज असते पण हे पेक्टीन काही फळांमधे मुबलक असल्याने त्याचे जॅम अगदी सहजच जमतात. माझ्या अनुभवावरून ज्या फळांची चव किंचित तुरट असते त्यामध्ये हे पेक्टीन मुबलक असते, उदाहरणार्थ आवळा. क्रॅब ऍपल तर जणू डिंकच; शिजत आला कि आपोआपच जमायला लागतो, गार होण्याआधीच!

या जेलीची चव मस्त आंबटगोड आली आहे पण सर्वात मस्त आहे तो त्याचा रंग! सुंदर गुलाबी रंगाची ही जेली ब्रेडबरोबर तर खाता येतेच पण केक्सवर किंवा पेस्त्रीवर ग्लेझ बनवायलाही त्याचा उपयोग करता येईल. ‘रिव्हर कॉटेज’ नावाच्या माझ्या एका आवडीच्या कार्यक्रमात तर, एकदा क्रॅब ऍपल जेली वापरून एक ‘डिपिंग सॉस’ बनवला होता. कृतीसाठी इथे पहा. 

वेगवेगळ्या हवामानात, वेगवेगळ्या ऋतुंमध्ये असंख्य प्रकारच्या फळफळावळींनी निसर्ग दोहो हातांनी भरभरून देत असतो पण हा बहर थोडाच वेळ टिकतो म्हणून आपण त्या चवी हवाबंद करून दुसऱ्या ऋतुंमध्ये न्यायचा प्रयत्न करायचा…इतकेच.

Advertisements

Read Full Post »

रविवारची सकाळ म्हणजे आळसटलेली. उशीरा उठल्यानंतर नाश्त्याची वेळ निघून गेलेली असते आणि पोटात कावळे कोकलत असल्याने दुपारच्या जेवणापर्यंत थांबायची तयारी  नसते म्हणून मग चहा झाला की लगेच ब्रंच! भरपेट आणि पट्कन काहीतरी खायचं असलं की ब्रेड आणि अंडी समोरच दिसतात पण काहीतरी वेगळं केलं म्हणजे मंडळी जरा खूश होतात. आज मात्र मला काल आणलेला मस्त ‘राय’ ब्रेड खायचाच होता आणि त्याबरोबर स्क्रॅंम्बल्ड एग्ज म्हणजे माझ्या अगदी आवडीचे! पण जरा साग्रसंगीत बेत करावासा वाटला म्हणून नवऱ्याला गोडीगुलाबीने मश्रूम्स आणायला धाडले आणि मी टोमॅटोची चटणी करायला घेतली. दारातल्या चेरी टोमॅटोच्या झाडावर अजूनही बरेचसे टोमॅटो आहेत; काही पिकलेले आणि काही कच्चे. पण आता चांगलीच थंडी पडायला लागली असल्याने कच्चे टोमॅटो काही पिकणार नाहीत म्हणून मग मी सगळे गोळा केले आणि नेहमीसारखी आंबट-गोड चटणी बनवली. तोपर्यंत मश्रूम्सहि आले. मीठ, मिरे , जिरे आणि शहाजिरे एकत्र कुटून ते मश्रूम्सवर चोळले आणि मश्रूम्स किंचित तेलात तव्यावर घातले. त्याच्याच बाजूला थोडे चेरी टोमॅटो आख्खे टाकले आणि ब्रेडला थोडे लोणी लाऊन ओव्हनमध्ये ठेवले. मग दुसऱ्या तव्यात स्क्रॅंम्बल्ड एग्ज बनवायला घेतले. सगळं बनवून झाल्यावर ताटात छान वाढून फोटो काढेपर्यंत मी कसाबसा दम काढला आणि वळून पहाते तो जनतेने त्यांच्या खाण्याचा फडशाही पाडला होता. स्क्रॅंम्बल्ड एग्ज, ब्रेड आणि मश्रूम्स यापूर्वी अनेकदा खाल्लेलं आणि आवडलेलं पण त्याचं हे देशी रूपही मस्त आहे. एकूण बेत सगळ्यांच्या पसंत पडलेला दिसला आणि अगदी नेहमीच्या खाण्याला थोडं वेगळं बनवल्याने मलाही समाधान वाटलं.

टोमॅटोची चटणी

२०-२५ चेरी टोमॅटो किंवा ३-४ मध्यम टोमॅटो, १ हिरवी मिरची, १०-१२ छोटे सांबार कांदे किंवा १ मध्यम कांदा, ३-४ पाकळ्या लसूण, १ इंच आले (खिसलेले),   १ मोठा चमचा टोमॅटो पेस्ट, १ चमचा पंचफोरण (मोहरी, जिरे, मेथी, बडीशेप, कलौन्जी), फोडणीचे इतर साहित्य (तेल, हिंग, कडीपत्ता), कोथिंबीर,  १ मोठा चमचा गूळ, लिंबू किंवा चिंच चवीप्रमाणे, मीठ चवीप्रमाणे.

टोमॅटो, लसूण आणि कांदा चिरून घ्या. तेलाची पंचफोरण घालून फोडणी करा आणि त्यात चिरलेला कांदा, मिरची घालून परता. कांदा मऊ झाल्यावर आले, लसूण घाला, टोमॅटो पेस्ट घाला आणि पुन्हा थोडे परता. आता टोमॅटो घाला आणि शिजेपर्यंत बारीक आचेवर ठेवा. शिजल्यावर मीठ, गूळ आणि कोथिंबीर घालुन हलवा आणि चटणी मिक्सरवर थोडीशी वाटा. जास्त बारीक वाटू नका. हवे असल्यास वरून पुन्हा थोडी फोडणी घाला. थोडे लिंबू किंवा चिंच आंबटपणासाठी घाला. टोमॅटो किंचित आंबट किंवा कच्चे असतील गरज पडणार नाही पण जर टोमॅटो खूप गोड असतील तर घाला.

मश्रूम्सला लावण्यासाठी मसाला

१/२ चमचा जिरे, १ चिमूटभर शहाजिरे, ५-६ मिरे आणि थोडे मीठ एकत्र करून दगडीमध्ये थोडे बारीक करा आणि मश्रूम्सवर पसरून घाला.

Read Full Post »

एक घास चिऊचा, एक घास काऊचा; अशीच काहीशी सुरवात.
गोष्टी ऐकत, चाखत-माखत, सुरवात माझ्या प्रवासाची, चारचौघांसारखी.
रसाचा प्रवास, गंधाचा प्रवास, जिभेच्या चोचल्यांचा प्रवास.
मग शेतांतून बागडत, झाडांवरून लोंबकळत, शेजारच्यांच्या बागेत चोऱ्यामाऱ्या करत,
पडत-धडत, मस्तं पारखली ताज्या फळांची चव.
खास करून कैऱ्या, अजुनी कोयही न धरलेल्या,
चिकाने तोंड उभरले, आंबट्कच्च दात आंबले, तरी मस्तं.
करवंदाच्या जाळ्या धुंडाळता, धुंडाळता,
काटेरया फांद्यानी हात खरवडून काढले, तरी मस्तं.
जांभूळे खाऊन-खाऊन नीळी-नीळी जीभ अगदी बधीर होऊन गेली तरी मस्तं.
ऊसाची चोयटी अगदी शेवटच्या गोड थेंबापर्यंत चोखून जीभ सोलवटली, तरी मस्तं. सगळं मस्तं. झेंडूची फुलं मस्तं, त्याच्या पाकळ्यांच्या आतलं खोबरं मस्तं.
घाणेरीच्या फुलांतून चोखलेला मध मस्तं. तुरट आवळे मस्तं, चिंचेचा कोवळा पाला मस्तं.
काही म्हणून सोडलं नाही. सगळं ओरबाडलं,चाखलं, रुचलं ते घेतलं, नाही तेही अनुभवलं.
आई पहात नसताना तिखट-मिठाच्या पुड्या बांधून, कौलांवर बसून, कैऱ्या लांबवून, कळकट प्लास्टीकच्या डब्यात, तिथल्यातिथे लोणचे तय्यार!
सूरु झाली उन्हाळी वाळवणी की राखायचे काम आम्हा भुरट्याकडे .
साबुदाण्याचे सांडगे वाळायच्या आतच निम्मे पोटात!
“अरे बाळांनो, कच्चे खाऊ नका, पोटात दुखेल”
“ते सांग त्या चिमण्यांना. आही फक्त राखतोय.”
पापडाच्या लाट्याचीही तीच तऱ्हा. कच्च्याच चघळणार.
दमच कमी. लाटणार कधी, वाळणार कधी, तळणार कधी आणि खाणार कधी?
तरी सारं पाहिलं, कोवळ्या मानाने सारं शोषलं,
दिवसरात्र आईमागे स्वयंपाकघरात लुडबुडत सारं काही टिपलं.
अशी कणिक मळते, असे पीठ पेरते, कुटते, पाखडते, मधूनच चाखते.
मातीच्या गोळ्याला कुंभार नुसता स्पर्श करतो, अन् डोळ्यांदेखत घडा उभारतो. सहजच.
तसाच हा माझा प्रवास.
धाडसी मूलपणाचा, सावध आईपणाचा, चवीचा, ढवीचा,
न ओळखता आलेल्या हादग्याच्या खिरापतीचा.
गोष्टही पुढे चालू रहाते, पिल्लू माझे आता मागेमागे धावते,
मी तिला भरवते, सांगते, एक घास चिऊचा, एक घास काऊचा.

Read Full Post »