मला बरीच वर्षे कुल्फी प्रकार फारसा आवडायचा नाही; अगदी नाही म्हणायला कधीतरी खाल्ली असेलही पण लहानपणी एकूणच मला दुधाचा तिटकारा होता आणि म्हणून मसाला दूध, बासुंदी, कुल्फी वगैरे काहीच आवडायचं नाही. हळूहळू आवडीनिवडी बदलल्या आणि मला कुल्फीही आवडायला लागली पण इथे कुठली मेवाडची कुल्फी मिळणार म्हणून मग स्वतःच बनवायला लागले. पण तरी इव्हॅपरेटेड किंवा कंडेन्स्ड दूध वापरून बनवलेल्या कुल्फीची काही मजा येईना. यावेळेस मला पिस्त्याची कुल्फी बनवायची होती, म्हणजे नुसते थोडे पिस्ते आणि हिरवा रंग घातलेली नव्हे तर भरपूर पिस्त्यांचा पुरेपूर स्वाद आणि नैसर्गिक रंग असलेली कुल्फी. पण अशी मनाजोगी कृती काही सापडेना म्हणून अंदाजपंचे पिस्ता जेलाटो (इटालियन आईस्क्रीम) आणि कुल्फी यांच्या कृती मिसळून बनवून पहायचे ठरवले. इटलीला गेलो असताना आईस्क्रीममध्ये वेगवेगळ्या प्रकारे, नैसर्गिकरित्या किती चवींचं वैविध्य आणता येतं हे अगदी येथेच्छ अनुभवलं होतं त्यामुळे जेलाटोच्या कृतीचा उपयोग करायचा ठरवला. खरेतर कुल्फी मशीनमध्ये फिरवत नाहीत पण मी आईस्क्रीम मशीन वापरून थोडी फिरवली आणि मग फ्रीज केली. ही अशी प्रायोगिक कुल्फी इतकी मस्त जमली की ती आता वारंवार केली जाईल. आता याला पिस्ता जेलाटो म्हणायचं की पिस्ता कुल्फी हे तुम्हीच ठरवा पण हा पदार्थ चवीला नक्की उत्तम होईल याची ग्वाही द्यायला मी तयार आहे.
१ लिटर दूध
२५० मिली क्रीम
७५ ग्रॅम पिस्ते
चार-पाच मोठे चमचे साखर
दोन मोठे चमचे मध
एक छोटा चमचा कॉर्नफ्लॉर
१) पहिल्यांदा एका जाड बुडाच्या भांड्यात, मंद आचेवर दूध आटवायला ठेवले. पंन्नास ग्रॅम पिस्ते गरम पाण्यात भिजवायला ठेवले आणि उरलेल्या पिस्त्यांचे बारीक तुकडे करून ठेवले.
२) दूध खाली न लागेल याची काळजी घेत, साधरणतः निम्मे होईपर्यंत आटवले. नंतर त्यातच क्रीम मिसळून आणखी पाच-दहा मिनिटे आचेवर ठेवले आणि मग खाली उतरवले.
३) भिजवलेल्या पिस्त्याच्या साली काढून घेतल्या आणि त्यात मध आणि पाव कप आटवलेले दूध मिसळून मिक्सरवर बारीक गंधासारखे वाटून घेतले. दुसऱ्या एका भांड्यात आटवलेल्या दूधापैकी पाव कप घेऊन ते पूर्ण गार झाल्यावर त्यात कॉर्नफ्लॉर एकजीव होईपर्यंत मिसळले.
४) आटवलेल्या दुधात साखर मिसळून ते पुन्हा आचेवर ठेवले आणि त्यात पिस्त्याचे वाटण आणि दुधात मिसळलेले कॉर्नफ्लॉर घालून चांगले मिसळले व ढवळत राहिले. मिश्रण थोडे दाट झाल्यावर आचेवरून उतरवले व गार होऊ दिले.
५) पूर्ण गार झाल्यावर आईस्क्रीम मशीनमध्ये घालून, थोडी जमेपर्यंत कुल्फी फिरवली आणि मग साच्यांमध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवली. दोन तासांत कुल्की छान घट्ट जमली. साच्यातून काढताना ते दहा-बारा सेकंद गरम पाण्यात धरले आणि मग हलक्या हाताने बाहेर ओढले.




Kiti chaan lihites ga tu! Kulfi pan mast disat aahe. I will try it for sure.