एक घास चिऊचा, एक घास काऊचा; अशीच काहीशी सुरवात.
गोष्टी ऐकत, चाखत-माखत, सुरवात माझ्या प्रवासाची, चारचौघांसारखी.
रसाचा प्रवास, गंधाचा प्रवास, जिभेच्या चोचल्यांचा प्रवास.
मग शेतांतून बागडत, झाडांवरून लोंबकळत, शेजारच्यांच्या बागेत चोऱ्यामाऱ्या करत,
पडत-धडत, मस्तं पारखली ताज्या फळांची चव.
खास करून कैऱ्या, अजुनी कोयही न धरलेल्या,
चिकाने तोंड उभरले, आंबट्कच्च दात आंबले, तरी मस्तं.
करवंदाच्या जाळ्या धुंडाळता, धुंडाळता,
काटेरया फांद्यानी हात खरवडून काढले, तरी मस्तं.
जांभूळे खाऊन-खाऊन नीळी-नीळी जीभ अगदी बधीर होऊन गेली तरी मस्तं.
ऊसाची चोयटी अगदी शेवटच्या गोड थेंबापर्यंत चोखून जीभ सोलवटली, तरी मस्तं. सगळं मस्तं. झेंडूची फुलं मस्तं, त्याच्या पाकळ्यांच्या आतलं खोबरं मस्तं.
घाणेरीच्या फुलांतून चोखलेला मध मस्तं. तुरट आवळे मस्तं, चिंचेचा कोवळा पाला मस्तं.
काही म्हणून सोडलं नाही. सगळं ओरबाडलं,चाखलं, रुचलं ते घेतलं, नाही तेही अनुभवलं.
आई पहात नसताना तिखट-मिठाच्या पुड्या बांधून, कौलांवर बसून, कैऱ्या लांबवून, कळकट प्लास्टीकच्या डब्यात, तिथल्यातिथे लोणचे तय्यार!
सूरु झाली उन्हाळी वाळवणी की राखायचे काम आम्हा भुरट्याकडे .
साबुदाण्याचे सांडगे वाळायच्या आतच निम्मे पोटात!
“अरे बाळांनो, कच्चे खाऊ नका, पोटात दुखेल”
“ते सांग त्या चिमण्यांना. आही फक्त राखतोय.”
पापडाच्या लाट्याचीही तीच तऱ्हा. कच्च्याच चघळणार.
दमच कमी. लाटणार कधी, वाळणार कधी, तळणार कधी आणि खाणार कधी?
तरी सारं पाहिलं, कोवळ्या मानाने सारं शोषलं,
दिवसरात्र आईमागे स्वयंपाकघरात लुडबुडत सारं काही टिपलं.
अशी कणिक मळते, असे पीठ पेरते, कुटते, पाखडते, मधूनच चाखते.
मातीच्या गोळ्याला कुंभार नुसता स्पर्श करतो, अन् डोळ्यांदेखत घडा उभारतो. सहजच.
तसाच हा माझा प्रवास.
धाडसी मूलपणाचा, सावध आईपणाचा, चवीचा, ढवीचा,
न ओळखता आलेल्या हादग्याच्या खिरापतीचा.
गोष्टही पुढे चालू रहाते, पिल्लू माझे आता मागेमागे धावते,
मी तिला भरवते, सांगते, एक घास चिऊचा, एक घास काऊचा.


फारच छान! सुंदर लिहीतेस, अावर्जून वाचत जाईन.
Chukun engineer zalis, marathi lekhika vhayachis.
Sadhe saral likhan vachat rahave aase vatate.
Shilpi, khupach sundar !
Very good Shilpa…Great Job! Tuzhamadhali sugaran ammhi Singapore madhe asatanach olakhali hoti. Indeed you are a great cook. Wish you all the best for your blog and keep writing!! Good Luck!
Khupach chaan!!
प्राची, शिरीष, प्रिया, व्ही इथे थांबून आवर्जून अभिप्राय नोंदवल्याबद्दल मनापासून आभार. संगीता, तुमचा हात कौतुक करण्यातही खूप मोठा आहें आणि तुमच्याकडून मी सी फूड विषयी किती शिकले आहें ते मला पुरते ठाऊक आहें!